पत्रकारांसाठी 3 डिसेंबरला मोफत आरोग्य तपासणी !

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचं आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: December 02, 2023 17:56 PM
views 125  views

सावंतवाडी : पत्रकारितेच्या अत्यंत धावपळीच्या क्षेत्रात सर्व समाजाचे प्रश्न मांडत असताना आपले स्वतःकडे व स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत असते. आरोग्याकडे होत असलेल्या या दुर्लक्षाचा वेळप्रसंगी मोठा फटका आपल्याला व पर्यायाने आपल्या कुटुंबालाही बसतो. हीच बाब गांभीर्याने घेत मराठी पत्रकार परिषदेचा ३ डिसेंबर हा वर्धापन दिन आरोग्यदिन म्हणून जाहीर झाला असून या दिवशी राज्यभर पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले. 


त्यानुसार सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रविवार तीन डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. गतवर्षी राज्यभरात ८ हजारापेक्षा अधिक पत्रकारांनी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून घेतली.यावर्षीही मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनी म्हणजेच ३ डिसेंबरला राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी १० हजारापेक्षा अधिक जणांच्या तपासणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. 


आरोग्य तपासणीचे महत्व लक्षात घेऊन जास्तीत जास्त पत्रकारांनी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून घ्यावा‌. आपले व आपल्या परिवाराचे आरोग्य खुप मोलाचे व महत्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या परिवाराचा एक घटक म्हणून आपल्याला विनंती करतो की, कृपया या शिबीरात आपली व आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करून घ्याच. रुग्ण तपासणी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची डॉक्टरांची टीम करणार आहे.  उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी उद्या ३ डिसेंबर २०२३ सकाळी १०.३० वा उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष हरिश्चंद्र पवार व सचिव मयुर चराठकर यांनी केलं आहे.