
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचा मुख्य कार्यक्रम सोमवारी सिंधुनगरी येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनात संपन्न होत आहे. राज्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले आहे.
सिंधुनगरी येथील पत्रकार भावनात अत्याधुनिक सुविधा असाव्यात यासाठी मंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रकार भावनातील आवश्यक कामे हाती घेतली आहेत. मिनी सभागृह हायटेक प्रणाली बसविण्यात येत आहे. एलसीडी प्रोजेक्टर, साऊंड सिस्टिम, टीव्ही युनिट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आदी सुविधा सुरू होत असून याचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय पुतळा सजावट पूर्ण होत आहे. या व्यतिरिक्त भावनातील लिफ्ट सुविधा, जनरेटर सुविधा, मुख्य सभागृहात एलसीडी प्रोजेक्टर, निवासी सूटमध्ये एसी सुविधा, बाळशास्त्री जांभेकर कलादालन, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यालय अशी जवळपास पंधरा प्रकारची कामे घेण्यात आली आहे. यासाठी सुमारे एक कोटीचा निधी आवश्यक असून आवश्यक असणारा सर्व खर्च करू अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार संघाला दिली आहे.
पत्रकार दिनाच्या या मुख्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार व सन्मान होणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात पत्रकार संघाच्या ओळखपत्रांचे वितरणही होणार आहे. या भावनात मंत्रिमंडळ प्रथमच येत असलेले नितेश राणे आमदार निलेश राणे, आमदार दीपक भाई केसरकर आदी मान्यवरांचा सत्कार व सन्मान होणार आहे.