बौद्ध समाजाची शनिवारी ओरोस इथं संयुक्त सभा...!

सेवानिवृत्त संघटनेचे उपस्थित राहाण्याचे आवाहन
Edited by:
Published on: August 19, 2023 16:48 PM
views 109  views

सावंतवाडी : वेगवेगळ्या सामाजित चळवळीत सक्रीय असूनही बौद्ध समाज सहकार क्षेत्रात पिछाडीवर असल्याने समाजाची आर्थिक प्रगती होवू शकलेली नाही ही वस्तुस्थिती असल्याने समाजाची आर्थिक स्तर उंचावण्यासाठी समाजाची पतसंस्था उभारण्याचा संकल्प करून सेवानिवृत्त बौद्ध संघटनेने सर्व सामाजाला संघटित करून समाजाची पतसंस्था उभारण्याचा संकल्प केला असून यासंदर्भात विचारविनीमय करण्यासाठी समाजातील सर्व संघटनांची संयुक्त सहविचार सभा येत्या शनिवार दि. 26 ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय भवन ओरोस येथे आयोजित केली आहे.

या संदर्भात सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी, कर्मचारी संस्थेने एक निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात चळवळीच्या माध्यमातून भरीव योगदान दिल्याचे नमूद केले आहे. मात्र सहकार क्षेत्रात समाजाने अस्तित्व निर्माण न केल्याने आपले या क्षेत्रात स्थान नगण्य असल्याचे स्पष्ट केले आहे. 

जिल्ह्यात आपला समाज मोठा असूनही व विविध क्षेत्रात आपण कार्यरत असूनही समाजाची एकही पतसंस्था उभी राहू शकली नाही. याची कारणे काही असली तरीही सहकार क्षेत्रात आपले अस्तित्व नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. म्हणूनच समाजातील सर्वच घटकांना संघटित करून बौद्ध समाजाची म्हणून पतसंस्था उभारण्याचा संकल्प आम्ही आपल्या सहकार्याने केला आहे.

या संदर्भात बौद्ध समाजाची संयुक्त बैठक येत्या शनिवार दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वा. ओरोस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पतसंस्था स्थापन करण्याबाबत विचारविनीयम करण्यात येणार आहे. तरी बौद्ध बांधवांनी सदर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिव मोहन जाधव, कार्याध्यक्ष अरविंद वळंजू व अध्यक्ष सूर्यंकांत कदम यांनी केले आहे.