
सावंतवाडी: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या प्रेरणेतून नेमळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये नुकताच मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ परिवाराचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांच्या भाषणाने झाली. त्यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. ॲड. पार्सेकर म्हणाले की, "दानशूर समाजसेवक निलेश सांबरे हे गेल्या वीस वर्षांपासून कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये पर्यावरण, रोजगार, शिक्षण, आणि आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने सेवाभावी उपक्रम राबवत आहेत."
यावेळी त्यांनी माहिती दिली की, जिजाऊ संस्थेतर्फे आतापर्यंत जिल्ह्यातील बहुतेक शाळांमध्ये दीड लाखांहून अधिक वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बोवलेकर यांनी निलेश सांबरे यांचे विशेष आभार मानले.
या वह्या वाटप कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. प्रभूतेंडोलकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मानसी परब, समुपदेशक श्रीमती अर्पिता वाटवे आणि सहशिक्षक अनिल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.










