मुंडे महाविद्यालयात ज्वेलेरी मेकिंग प्रशिक्षण

Edited by: मनोज पवार
Published on: October 07, 2025 11:13 AM
views 92  views

मंडणगड : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत महिला विकास कक्ष व एन. एस. एस. विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्वेलेरी मेकिंग प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  प्रशिक्षण कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून मंडणगडमधील माता रमाई भिमराव आंबेडकर व्यावसाय प्रशिक्षण केंद्राच्या सौ. रोशनी मर्चंडे उपस्थित होत्या. तर पाहुणे म्हणून मा. श्री. राजेश मर्चंडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.  विष्णू जायभाये होते. यावेळी महिला विकास कक्षाच्या डॉ.  संगीता घाडगे, डॉ.  ज्योती पेठकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, प्रा. तमन्ना मोरे, आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या. 

उपप्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विष्णू जायभाये यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी डॉ.  संगीता घाडगे  यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे  स्वागत करुन व सौ. रोशनी मर्चंडे यांचा परिचय करुन देवून कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना महाविद्यालयातील महिला विकास कक्षाव्दारे महिला सक्षमिकरणासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थीनीना ज्वेलरी मेकिंग म्हणजेच दागिने बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. सर्व विद्यार्थ्यांनीनी या संधीचा लाभ घ्यावा असे सांगितले.  

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेश मर्चंडे यांनी या उद्योग केंद्राव्दारे निर्मित उत्पादनाच्या विक्रीसाठी  बाजरपेठेतील विविध संधी याबद्दल थोडक्यात  माहिती देवून  जिल्हा उद्योग केंद्राव्दारे घेतल्या जाणा-या विविध केर्सेसनां प्रवेश घेण्याचे आवाहन केले. 

 प्रशिक्षिका म्हणून बोलताना रोशनी मर्चंडे यांनी जिल्हा उद्योग केंद्र व उद्योजकता विकास केंद्र या माध्यमातून चालविले जाणारे विविध कोर्सेस याबाबत विस्तृत माहिती देवून दागिने बनविण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. यामध्ये त्यांनी कर्णफुल, बांगडया, कडे, गळयातील विविध फॅशनचे अलंकार करुन दाखवले. शिवाय टाकावू वस्तूपासून बाहुल्या, पर्स, तोरण इत्यादी विविध सजावटीच्या वस्तू बनविण्यासाठी लागणारे साहित्य व त्याचे तयार करण्याची माहिती दिली. 

अध्यक्षिय समारोप करताना उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये म्हणाले की, आज जागतिकीकरण व खाजगीकरणाच्या काळात दिवसेंदिवस नोक-यांचे प्रमाण खूपच कमी होत चालले आहे. अशावेळी आपल्याकडे असणा-या कला-कौशल्यांच्या आधारे विविध प्रकारचे प्रशिक्षण घेवून आपण आपला स्वतःचा छोटा-मोठा उद्योग-धंदा सुरू करू शकतो. सर्व विद्यार्थ्यांनीनी आपल्यातील सुप्त कला-कौशल्ये ओळखून अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपला स्वतःचा एक आर्थिक स्त्रोत तयार करावा व स्वावलंबी बनावे.  

या कार्यक्रमास विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.  कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता डॉ. संगीता घाडगे, डॉ.  ज्योती पेठकर, प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. प्राची कदम, सोनाली मर्चंडे यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. तमन्ना मोरे यांनी मानले.