विजयदुर्ग बंदरात जेट्टी बांधण्यासाठी पुरातत्त्व विभागाची परवानगी !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 24, 2024 12:35 PM
views 79  views

देवगड : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग बंदरात जेट्टी बांधण्यासाठी पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे गेले चार वर्ष रखडलेले जेट्टी बांधण्याचे काम आता पूर्णत्वास जाणार आहे. विजयदुर्ग बंदराच्या विकासासाठी हे काम महत्वपूर्ण असल्याने केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, स्थानिक आमदार नितेश राणे यांनी केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभाग आणि मत्स्य विभाग यांच्याशी समन्वय साधून ही परवानगी प्राप्त केली आहे.

गेले चार वर्ष जेट्टी बांधण्याचे काम रखडले होते. विजयदुर्ग हे कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर असल्याने त्याचा विकास व्हावा अशी जनता आणि मच्छिमार बांधवांची मागणी होती. मात्र या बंदरात बोट यार्ड नसल्यामुळे बोटी नांगरता येत नव्हत्या. त्यामुळे देवगड, राजापूर, रत्नागिरी अशा ठिकाणी असणाऱ्या बंदरांचा आसरा घ्यावा लागत होता. पावसाळ्यात वादळी स्थिती निर्माण होते तेव्हा सुद्धा विजयदुर्ग बंदरात अनेक बोटी आश्रयासाठी येतात. मात्र सुसज्ज जेट्टी नसल्यामुळे गैरसोय होत होती. याची सर्वांची गरज ओळखून बंदर विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आता पुरातत्व विभागाने ही जेट्टी बांधण्यासाठी परवानगी दिल्याने विकसित होणाऱ्या बंदरात विजयदुर्ग वासियांना मासेमारी करण्यासाठी सर्व सोयींनी परीपूर्ण बंदर मिळणार आहे.