
देवगड : जमीन वादातून जेसीबीच्या सहाय्याने कंपाऊंड आणि शेतघर तोडल्या प्रकरणी मिठबांव येथील 15 जणांविरूध्द देवगड पोलिसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वा. मुदतीत मिठबांव गोरक्ष गणपती मंदीर नजिक असलेल्या जागेत घडली आहे. जमीनीच्या वादातून जेसीबीच्या सहाय्याने जागेतील कंपाऊंड, शेतमांगर तोडून, पाडून लागवड केलेली 50 आंबा कलमे आग जाळून उपटून टाकून नुकसान केल्याप्रकरणी देवगड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिठबांव येथील पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
या विषयी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मिठबांव आडारीवाडी येथील परशुराम पांडूरंग लोके(66) यांच्या मालकीची मिठबांव गोरक्ष गणपती मंदीरानजिक असलेल्या सर्व्हे नं.402 हिस्सा नं.1 या क्षेत्रात जागा आहे.या जागेत असलेले दगडी कंपाऊंड, शेतघर जमीनजागेच्या वादातून त्यांचा चुलत भावासहीत 15 जणांनी संगनमतांनी आत अनधिकृतपणे प्रवेश करून जेसीबीच्या सहाय्याने तोडले व पाडले.तसेच त्या क्षेत्रात असलेली 50 हापूस आंब्याची कलमे जाळून टाकली व उपटून टाकली.
पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये मिठबांव येथील अनिल पांडूरंग लोके, चंद्रकांत नाना लोके, अनिकेत विजय लोके, दिप्ती प्रदीप लोके, हेमचंद्र प्रकाश लोके, परेश गजानन लोके, जयेश शैलेंद्र लोके, महादेव एकनाथ लोके, वासूदेव देवू लोके, अशोक गंगाराम लोके, सत्यविजय गंगाराम लोके, विलास महादेव लोके, पुनम हेमचंद्र लोके, अनंत बाजीराव लोके व सचिन गावकर(रा.नारींग्रे) या पंधराजणांनी संगनमत करून अनधिकृतपणे प्रवेश करून जेसीबी नेवून त्याच्या सहाय्याने कंपाऊंड व शेतघर तोडून, पाडून व लागवड केलेली 50 हापूस आंब्याची कलमे जाळून उपटून टाकली असे म्हटले आहे.
या घटनेचा अधिक तपास महिला पो.हे.कॉ.अमृता बोराडे करीत आहेत. तर या घटनेतील 15 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.