जयंत पवार कथा पुरस्कार ऐश्वर्या रेवडकर, जयदीप विघ्ने यांना जाहीर

Edited by: संदीप देसाई
Published on: November 27, 2023 13:11 PM
views 173  views

कणकवली : सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग सुपुत्र साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ कथाकार जयंत पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. बार्शी येथील ऐश्वर्या रेवडकर यांच्या 'एका आत्महत्येची तयारी' व बुलढाणा येथील जयदीप विघ्ने यांच्या 'सटवा' या कथांना जयंत पवार कथा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्काराचे वितरण डिसेंबरमध्ये मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या समाज साहित्य विचार संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि प्रमुख कार्यवाह वैभव साटम यांनी दिली. 

    पाच हजार रुपये, स्मृती चिन्ह, ग्रंथ असे स्वरूप असलेल्या या स्पर्धेतील  प्राथमिक कथा निवड परीक्षक म्हणून समीक्षक डॉ. गोमटेश्वर पाटील- कोल्हापूर, कथाकार प्रा. विवेक कुडू - पालघर आणि कादंबरीकार संतोष जगताप - मंगळवेढा यांनी तर अंतिम कथा निवड परीक्षक म्हणून कादंबरीकार कृष्णात खोत - कोल्हापूर व कथाकार आसाराम लोमटे- परभणी यांनी काम पाहिले.  

         प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेला राज्याच्या विविध भागातून भरघोस प्रतिसाद मिळाला. तब्बल १०७ कथांमधून ही निवड करण्यात आली आहे. दिवंगत नाटककार, साहित्यिक जयंत पवार हे मराठीतील महत्त्वाचे लेखक होते. जयंत पवार यांच्या अनेक कथा मानवी जीवन, त्यातील विविध कंगोरे, अंतर्विरोध टिपत प्रगाढ मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या आहेत. त्यांनी आपल्या कथांमधून महानगराचा बदलता अवकाश आणि त्याच्या कराल दाढेत कष्टकरी माणसांच्या वेदना तसेच जागतिकीकरणाने सामान्य माणसाच्या आयुष्यात झालेली उलथापालथ नेमकेपणाने चित्रित केली आहे. पवार यांच्या साहित्याला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी दर्जेदार एका वाड: मय प्रकाराला हा पुरस्कार दिला जाणार आहे असेही श्री मातोंडकर आणि श्री.साटम यांनी सांगितले.

      संमेलनासंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क : प्रियदर्शनी पारकर - सहकार्यवाह ( 94049 06570)