अर्चना घारेंनी घेतली जयंत पाटीलांची भेट

कर्ज माफी संदर्भात वेधलं लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: July 04, 2024 09:17 AM
views 62  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्ज माफी संदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष तथा आमदार  जयंत पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने लक्ष वेधले. कर्ज माफी संदर्भात लक्षवेधी मांडून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात मदत मिळावी यासाठी आ. जयंत पाटील यांच्याकडे विनंती केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने घोषित केलेल्या कर्ज माफी बाबतची अ‌द्याप पूर्तता करण्यात आली नसून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत उर्वरित शेतक-यांना लाभ मिळणे, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांवरील शेतक-यांना कर्जमाफी, खावटी कर्जमाफी व खावटी कर्जमाफीची मुदत वाढविणे यासह नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान ५० हजार देण्याबाबत तरतूद आहे. कोकणातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीने देखील अनेक वेळा अडचणीत आलेला असून वरील बाबींवर सरकार कोणताच निर्णय घेत नाही. यावर तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल सरकारकडून आदेश काढण्यात आला असून ती रक्कम अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा झाली नाही. २ लाखावरील थकबाकी असणारे शेतकरी मध्यभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय झाला नसून यामध्ये अनेक शेतकरी कर्जमाफी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व गोष्टी गांभीर्यतेने विचार करून मार्गी लावाव्यात ही सिंधुदुर्ग मधील तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्ज माफी संदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात मदत व्हावी अशी विनंती माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय, सचिव महेश चव्हाण, राष्ट्रवादीचे तुळस विभाग अध्यक्ष अवधूत मराठे, संदीप घारे आदी उपस्थित होते.