जयानंद मठकर स्मृती व्याख्यानमाला ४ एप्रिल पासून..!

Edited by: विनायक गावस
Published on: March 26, 2024 06:56 AM
views 51  views

सावंतवाडी :  श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन, सावंतवाडी यांच्यावतीने स्वातंत्र्यसैनिक जयानंद मठकर व्याख्यानमालेचे आयोजन ४ ते ७ एप्रिल २०२४ पर्यंत करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन गुरुवार ४ एप्रिल रोजी मुंबई येथील पत्रकार राजू परुळेकर यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यावेळी परुळेकर यांचे ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ व्याख्यान होणार आहे.

दुसऱया दिवशी ५ एप्रिलला ‘लोकसाहित्यातील स्त्री ’ यावर मुंबई येथील पत्रकार आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांचे  व्याख्यान होणार आहे. तर ६ एप्रिल रोजी पुणे येथील स्त्रीरोगतज्ञ आणि साहित्यिका डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांचे  ‘भारतीय स्त्रिया- प्रश्न आणि प्रश्न’ यावर व्याख्यान होणार आहे. ७ एप्रिल रोजी जयानंद मठकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त जयानंद मठकर स्मृती पुरस्कार निवृत्त माहिती व जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलाताई परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्त ‘कोकणातील बदलते पर्यावरण आणि कातळशिल्पांचे जतन’ हे सतीश लळीत यांचे व्याख्यान होणार आहे. चार दिवसीय या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.