
वेंगुर्ले : सावंतवाडी विधानसभा मतदार संघात दीपक केसरकर यांनी गेल्या ३ टर्म मध्ये आमदार म्हणून काम करत असताना व आता शिक्षण मंत्री म्हणून काम करत असताना मोठ्या प्रमाणात सर्वच क्षेत्रात निधी दिला आहे. हा निधी देत असताना ती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाची आहे. हे न बघता माझ्या मतदार संघात सर्व लोकांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी भरगोस निधी प्रत्येक गावात दिलेला आहे. यामुळे आता सर्व पदाधिकारी यांनी गावागावात प्रत्येक घटकापर्यंत पोहोचा. या मतदार संघातील जनता निश्चितपणे दीपक केसरकर यांच्या पाठीशी राहील असा विश्वास शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी व्यक्त केला.
वेंगुर्ला तालुका शिवसेनेची विभाग निहाय आढावा बैठक आज सोमवारी (१५ जुलै) रोजी सचिन वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली सप्तसागर बिल्डिंग येथील शिवसेना कार्यालयात संपन्न झाली. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, कोस्टल तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, सुनील सातजी यांच्यासाहित तालुक्यातील विभागप्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना वालावलकर म्हणाले की, सध्या तालुक्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी नागरिकांचे नुकसान होत आहे. घरात पाणी शिरून झाडे पडून नुकसान होत आहे. या सर्व लोकांच्या घरी जाऊन आढावा घ्या. मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या सर्वांना निश्चितच मदत करू. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी संघटनात्मक आढावा घेत तालुक्यातील प्रलंबित जी विकासकामे राहिली आहेत ती त्या विभागातील विभाग प्रमुख यांच्याकडे द्यावीत ती मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात येतील तसेच तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांची भेट घेऊन तालुका कार्यालयात माहिती द्यावी असे आवाहन केले. तसेच यावेळी बोलताना उमेश येरम म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याने संघटनात्मक काम केले पाहिजे. वेंगुर्ला शहरात माझी लाडकी बहीण योजनेचे ऑफलाईन ३०० अर्ज आतापर्यंत शिवसेनेमार्फत भरले गेले आहेत. यातील २०० अर्ज नगरपालिका यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. आगामी काळात मंत्री केसरकर यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणायचे असेल तर संघटनात्मक कामांवर भर द्यावा असेही ते म्हणाले.
युवासेनेच्या पदाधिकारी यांची नियुक्ति
या सभेत युवासेना उपतालुका संघटकपदी प्रीतम सावंत, आडेली विभाग प्रमुख पदी सचिन परब, शिरोडा विभागप्रमुख पदी प्रथमेश बांदेकर, शिरोडा शाखा प्रमुख पदी गौरेश बर्डे, शिरोडा बूथ प्रमुख पदी पराग नाईक, वेंगुर्ला शहर शाखाप्रमुख पदी प्रेमानंद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.