
दोडामार्ग : पिकुळे येथील जलजीवन मिशचे अपुरे काम २० मे पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन संबंधित ठेकेदाराने उपोषण कर्त्यांना दिल्यानंतर दोडामार्ग पंचायत समिती समोर सुरु असलेले पिकुळे ग्रामपंचायतचे उपोषण मागे घेण्यात आले. मात्र, २० मे पर्यंत काम पूर्ण न झाल्यास आम्ही पुन्हा उपोषण करू असा इशारा सरपंच आपा गवस यांनी दिला.
पिकुळे येथे जलजीवन मिशनचे काम सुरू करण्यात आले. मात्र गेल्या वर्षभरापासून हे काम बंद स्थितीत आहे. पिकुळे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी संबंधित ठेकेदारास फोन लावला असता आज, उद्या, परवा काम सुरू करतो असे सांगून टोलवाटोलवी करत होता. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ऐन उन्हाळ्यात गावातील पाण्याची समस्या बिकट झाली. येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही दिला होता. मात्र याची दखल घेतली न गेल्याने पिकुळे सरपंच आपा गवस, उपसरपंच निलेश गवस, ग्रामपंचायत सदस्य रत्नदिप गवस, निशा गवस, शंकर गवस, योगिता सावंत व रामा नाईक यांनी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारी सकाळी उपोषणास सुरुवात केली.
या उपोषणाला स्वराज्य सरपंच सेवा संघ तालुकाध्यक्ष तथा झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, सासोली सरपंच प्रवीण गवस, उगाडे सरपंच सुजल गवस यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी बिपिन कोरगावकर हा ठेकेदार असून त्याच्याकडून तातडीने काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना दिले. संबंधित ठेकेदाराकडून लेखी स्वरूपात आम्हाला कळविण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरल्याने ठेकेदाराने हे काम २० मे पर्यंत पूर्ण करून देण्याचे लेखी पत्र दिल्याने दुपारी उपोषण मागे घेतले.