'या' जाबाज पोलीसांमुळे 'जाबाज कामगिरी'

ठोकर देऊन पसार झालेली इनोव्हा कार दाणोली चेकपोस्टवर अडविली
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 14, 2022 15:53 PM
views 303  views

सावंतवाडी : आता बातमी आहे सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस आणि आंबोलीतील पोलिसांच्या धडकेबाज कामगिरीची....अल्टोला ठोकर देऊन पसार होणाऱ्या इनोव्हाला केवळ अर्ध्या तासात रोखण्यात आंबोलीच्या पोलिसांना यश आलं. आंबोलीचे जाबाज पोलीस दत्तात्रय देसाई यांनी पुन्हा एकदा सिंघम कारवाई केलीय. त्यांच्या या कामगिरीची जोरदार चर्चा सुरु आहे.  

नेमकं काय घडलं ? 

बांदा पत्रादेवी इथं बॉर्डरवर ग्रे कलरच्या इनोव्हा क्रिस्टाने (MH 4LAX 7474) शिल्पा शिर्के यांच्या अल्टोला (MH 03BH 7824 ) ठोकर देऊन पसार झाला. शिल्पा शिर्के यांनी यासंदर्भात कोकणसाद LIVE ला माहिती दिली. त्यानंतर कोकणसाद LIVE ने तातडीने फोन फिरवत यंत्रणेला माहिती दिली. 112 आत्पकालीन यंत्रणा, सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखा आणि आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे जाबाज पोलीस दत्तात्रय देसाई यांना माहिती दिली. त्यानंतर त्या गाडीच्या शोधात संबंधित यंत्रणा कामाला लागली.  सुरुवातीला इन्सुली चेकपोस्टवरून पसार होण्यात या गाडीच्या चालकाला यश आलं. मात्र, आंबोलीत दत्तात्रय देसाई यांनी कडेकोट फिल्डिंग लावली होती. दरम्यान, दाणोली इथं पोलीस महेंद्र बांदेकर, आबा पिळणकर, प्रशांत धुमाळे यांनी तत्परता दाखवत आंबोलीच्या दिशेने प्रसार होणाऱ्या इनोव्हा कारला रोखले. कोकणसाद LIVE ने माहिती देताच केवळ अर्ध्या तासात त्या गाडीला रोखण्यात दत्तात्रय देसाई आणि पोलीस महेंद्र बांदेकर, आबा पिळणकर, प्रशांत धुमाळे यांच्यामुळे यश आलं. या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तप्तरता वाखाणण्याजोगी होती. 

माजी सार्वजनिक मंत्र्यांच्या नावाचा वापर करत पसार होण्याचा प्रयत्न  

त्या कारने इन्सुली चेकपोस्ट इथं माजी सार्वजनिक मंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांची गाडी असल्याचे सांगत त्या गाडीने इथून सुटका करून घेतली. अशी प्राथमिक माहिती मिळतेय. मात्र आंबोलीत त्याची ही हुशारी कामी आली नाही. 

जाबाज पोलीस दत्तात्रय देसाई यांचं होतंय कौतुक 

आंबोलीचे जाबाज पोलीस दत्तात्रय देसाई यांनी तातडीने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवत त्या पसार होणाऱ्या गाडीला रोखलं. यापूर्वी पोलीस देसाई यांनी अशाच धडाकेबाज कामगिरी केल्या होत्या. सावंतवाडी ड्युटीवर असताना मोती तलावात पडलेल्या किती तरी जणांचे त्यांनी प्राण वाचवले होते. तर अलीकडेच पावसाळ्यात पूर आलेल्या नदीतून वाहून जाणाऱ्या महिलेला आपला जीव धोक्यात घालून वाचवलं होत. आता पुन्हा अशीच कामगिरी त्यांनी केल्याने पुन्हा एकदा त्यांचं जोरदार कौतुक होतंय. 

या घटनेचा अधिक तपास बांदा पोलीस करतायत. 112 आपत्कालीन यंत्रणा, सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस आणि आंबोलीचे जाबाज पोलीस दत्तात्रय देसाई यांच्या तत्परता खरंच वाखाणण्याजोगी आहे. केवळ त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या अर्ध्या तासात दाणोलीत त्या इनोव्हाला रोखण्यात यश आलं. या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय.