
सिंधुदुर्गनगरी : पावसाचे दिवस सुरू झाले तरी गेले सुमारे पंधरा दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवारपासून आपले जोरदार आगमन केले आहे. गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात चांगला पाऊस पडला असून, पुढील चार दिवस जिल्ह्यात अति ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्याला रविवार पर्यंत येलो अलर्ट तर सोमवारी ऑरेंज अलर्ट वर्तविण्यात आला आहे. पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.
जून महिना पावसाचा महिना म्हणून मानला जातो. सहा जून या मृग नक्षत्राच्या प्रारंभापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होतो. यावेळी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला जिल्ह्यात पाऊस दाखल झाला मात्र त्यानंतर या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणले. आवश्यक तेवढा पाऊस नसल्याने शेतीची कामे खोळंबली होती. मात्र गुरुवारपासून पावसाने पुन्हा आगमन केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. गुरुवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला तर पुढील चार दिवस जिल्ह्यात अति ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सुरुवातीपासून जिल्ह्याला आवश्यक असलेला पाऊस न पडल्याने पाण्याचा प्रश्न आहे. मात्र आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस झाला तर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दरम्यान पुढील तीन दिवस जिल्ह्यात येलो अलर्ट तर सोमवारी ऑरेंज अलर्ट वर्तवीण्यात आला आहे.