आध्यात्म समजून घेणं आवश्यक : प. पू. परमात्मराज

Edited by: विनायक गावस
Published on: September 30, 2023 12:55 PM
views 105  views

परमार्थ मार्गात येण्यासाठी दिले जाणारे आमंत्रण हे सुदिव्य आमंत्रण आहे. त्याचा स्वीकार अनंत काळाच्या हितासाठी आवश्यक आहे. दहशतीने या विश्वातील समस्या सुटत नाहीत. विघातक कारवाया शिकविणाऱ्या संस्थांची आमंत्रणे स्वीकारणे वाईट आहे. पारमार्थिक आमंत्रण स्वीकारून अध्यात्म समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी ( ता. निपाणी) येथील संजीवन गिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने भाद्रपद पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी सकाळी श्री दत्त मंदिरामध्ये दत्तगुरुचरणी अभिषेक अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली.रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, आमंत्रण देणे म्हणजे बोलविणे. मित्र संबंध, नातेसंबंध टिकवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जात असते. व्यावहारिक हितसंबंध जपण्यासाठी आमंत्रणे दिली जात असतात. मात्र पारमार्थिक मार्गात दिले जाणारे आमंत्रण मोक्षाकडे नेणारे असते. पितरांची मिळकत हयात असलेले लोक खात असतात. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पितृपक्षात किंवा अन्य कालखंडात एक दिवस जेवणाचे आमंत्रण दिले जात असते. तशी परम्परा भारतीय संस्कृतीमध्ये चालत आलेली आहे.

मनुष्य जन्म दुर्लभ आहे. सालप ऋषींनी भद्ररथ राजाला पारमार्थिक भवनात बोलविले. पारमार्थिक भवनात जात, धर्म, संप्रदायाचा कोणताही भेद नाही. पारमार्थिक भवनात सगळे मावत असतात. मल दोष निवारण झाल्याशिवाय म्हणजेच मन:शुद्धी झाल्याशिवाय अध्यात्म मार्गात प्रवेश होणार नाही. सेंट ऑगस्टीन आफ्रिकेतील संत होते. ते इटाली मध्ये असताना बालकाच्या आवाजात त्यांना पवित्र वाचनासाठी बोलविण्यात आले. पुढील काळात त्यांच्या सिद्धांतांचा बोध ख्रिश्चन जनतेला झाला. हिंदू , मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी धर्मांचा सार काय आहे तो वाचला तर वादाची गरज राहणार नाही. सद्धर्म समजल्यानंतर परमार्थ मार्ग सुलभ होईल. चांगल्या विचारांचे आमंत्रण स्वीकारणे आवश्यक आहे. व्यवहारात औपचारिक व अनौपचारिक आमंत्रणे दिली जात असतात. परमार्थ मार्गातील आमंत्रण हे तळमळीचे असते. अनेक ऋषीमुनी साधू संतांच्या माध्यमातून परमार्थ मार्गात येण्याचे आमंत्रण दिले जात असते. 

सध्याच्या काळात पुष्कळशा लोकांकडून व्यक्तिगत पातळीवर तसेच देश पातळीवर सुद्धा अहंकार जोपासला जात आहे. त्यामुळे विनाशाला आमंत्रण दिले जात आहे. चांगल्या विचारांना, चांगल्या बाबींना आमंत्रण द्यावे. महायुद्धासारख्या विनाशक बाबींना आमंत्रण देऊ नये. म्हणूनच भारताने दुसऱ्या महायुद्धानंतरअलिप्तता स्वीकारली आहे. 

इराण मध्ये नवव्या शतकात सूफी संत बायजीद बस्तामी होऊन गेले. त्यांच्या जीवनात आध्यात्मिक ज्ञान मार्गाचा सुगंध पसरला होता. त्यांच्या जीवनात विशेष घटना घडून त्यांना पारमार्थिक मार्गाकडे आमंत्रित करण्यात आले. त्यामुळे ते संत बनले. 

गुन्हा करून लौकिक जगतातील पोलिसांच्या ताब्यातून कदाचित सुटका होईलही. परंतु यमपुरीतील पोलिसांच्या ताब्यातून शिक्षेशिवाय सुटका नाही. म्हणून माणसाने धर्मानुसार वागले पाहिजे. माणसाला अज्ञानाची नशा चढलेली आहे. त्यामुळे भवारण्यात गुरफटलेला आहे. माणसाला सत्तेची नशा चढते, पदाची नशा चढते. त्यामुळे धर्माने वागावे असे वाटत नाही. फक्त आपलेच चांगले व्हावे, असे वाटत असते. म्हणून माणसाने पारमार्थिक आमंत्रण स्वीकारून त्या मार्गावरून साध्य स्थान येईपर्यंत वाटचाल करावी. 

सर्व प्राणी मात्रात एकच आत्म चैतन्य आहे. आत्मतत्त्व हे समजून घेतल्याशिवाय परमार्थमार्ग समजणार नाही. परमार्थ मार्गाचे आमंत्रण हे लक्ष्य गाठेपर्यंत निरंतर चालण्यासाठी आहे. भद्रपदाकडे नेणारे आहे. मनुष्य देह हा भद्ररथ आहे. रथी आत्मा आहे. भद्रपद म्हणजे कल्याण पद होय. परमार्थ मार्गाने भद्ररथ वेगाने पळवायला पाहिजे, असे सांगितले.

यावेळी इचलकरंजी येथील जगदेव मामा ग्रुपच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी हालसिद्धनाथ कारखान्याच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल एम.पी. पाटील यांचा तसेच चेतन जोशी, भरत जोशी इचलकरंजी, ह भ प धर्माधिकारी महाराज शिरोळ,ॲड. अनिल प्रल्हाद विसाळ पुणे, बाळासो पाटील मलिकवाड, पैलवान अखिलेश सुनील कवठे, पै. समर्थ सुनील कवठे कागल यांच्या कुस्ती क्षेत्रातील यशाबद्दल, प्रवीण प्रकाश कासार कोगनोळी, डॉ संजय मिरजे , सुचेता  पाटील गोकाक,आदी मान्यवर व देणगीदारांचा परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आडी, बेनाडी, निपाणी, कागल, कोल्हापूर, बेळगांव, चंदगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई इ. भागातून आलेल्या कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यांतील अगणित भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.