'तो' घातपातच ; पोलिस तपासात उघड

Edited by: विनायक गावस
Published on: December 11, 2023 20:13 PM
views 388  views

सावंतवाडी : शहरातील सबनीसवाड्यात भाड्यानं रहणाऱ्या खेड येथील चैत्राली मेस्त्री(वय 35) या विवाहितेनं आत्महत्या केल्याच वृत्त समोर आलं होतं. परंतु, कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान, हा घातपात असल्याच पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात या गुन्ह्याचा छडा लावत संशयित चुलत दिराला संजय ऊर्फ संदेश धोंडू मेस्त्री   याला ताब्यात घेतले असून भिंतीवर डोके आपटून त्यानंतर ओढणीने गळफास लावत तिला जीवे ठार मारल्याची कबुली त्यांन दिली आहे. याप्रकरणी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.

सबनीसवाडा येथे भाड्याच्या घरात राहणारी रत्नागिरी खेड येथील विवाहिता चैत्राली मेस्त्री हिने शनिवारी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र या विवाहितेच्या अंगावर डोक्यावर जबर मारहाणीच्यां जखमा आढळून आल्या होत्या. त्या विवाहितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता प्राप्त झालेल्या अहवालात हा मृत्यू आत्महत्याने नाही तर तिला गंभीर मारहाण करण्यात आल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार या आत्महत्ये प्रकरणी  पोलिसांनी तिचा चुलत दिर संजय ऊर्फ संदेश धोंडू मेस्त्री याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आपणच तिचा खून केल्याची कबुली त्यांन दिली. 

मयत चैत्राली मेस्त्री हिचा विवाह रत्नागिरी खेड येथील निलेश मेस्त्री याच्याशी झाला होता. त्यांना तिन मुले आहेत. परंतु नवरा सातत्यानं दारू पिऊन मारहाण करीत असल्याने ती गेली बरेच महिने पुणे कोथरूड येथे माहेरी आईकडेचं राहायला होती. त्यानंतर तिचा चुलत दिर संदेश  तिच्या माहेरी गेला व त्याने तिला आपणासोबत गोव्यात येण्यास सांगितले. दिराला देखील दारूचे व्यसन असल्यामुळे तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर त्यान मुलांना जीवे ठार मारेन अशी धमकी दिली. त्यामुळे विवाहिता संशयित याच्यासोबत गोव्यात येण्यासाठी तयार झाली. गेल्या महिन्यात गोव्यात नेण्याच्या बहाण्याने संशयिताने तिला सावंतवाडी उतरवले व काही दिवस सावंतवाडीत भाड्याने राहवयाची विनंती केली. शहरातील सबनीसवाडा येथे गेली 2 महिना ते एका भाड्याच्या घरात राहत होते. तर तो एका भांड्याच्या दुकानात कामास राहिला. विवाहितेसोबत तिचा आठ वर्षाचा मुलगा पण होता. दरम्यान चैत्राली हिला ठार मारण्याच्या विचार करीत खुनाच्या घटनेच्या दिवशी आरोपी याने तिला सोबत घेत बाजारात आणले व खरेदी केली. त्यानंतर तो साडे दहा वाजता कामावर निघून गेला. दुपारी दिड वाजता जेवणासाठी घरी आला असता त्याने तिच्या लहान मुलाला खेळायला बाहेर पाठवले व दरवाजा आतून बंद करून घेतला. जेवण का वाढले नाहीस असे कारण उकरून काढत तिच्यासोबत भांडण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये देखील शाब्दिक खटके उडाले त्या रागाच्या भरात संशयित याने चैत्राली हिला मारहाण करीत तिचे डोके जोराने भिंतीला आपटले यात ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. त्यानंतर हॉल ते किचनमध्ये तिला ओढून नेत ओढणीच्या सहाय्याने तिला गळफास लावून छपराच्यां वाश्याला लटकवत ठार मारले.  ती मेली की नाही याची खात्री करण्यासाठी तिला स्टोव्ह पेटवून पायाला चटके दिले त्यानंतर ती मेली याची खात्री झाली असता ओढणी कापून काढून तिला खाली उतरवत बाहेर खेळण्यासाठी गेलेल्या मुलाला घरात बोलावून घेत चैत्रालीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. 

पोलिसांना या घटनेची कल्पना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस निरीक्षक ऋशीकेष अधिकारी यांनी वेगाने तपास करीत अवघ्या दोनचं दिवसात या खुनाचा छडा लावला. याबाबत मयत चैत्रालीच्या आईने पोलिस ठाण्यात खुनाची फिर्याद दिली त्यावरून संशयित संजय ऊर्फ संदेश धोंडू मेस्त्री याच्यावर फूस लावून पळवून आणणे, खून करणे, जबरी मारहाण करणे, खुनाची धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहिता चैत्राली मेस्त्री हिचा मृतदेह तिचा पती निलेश मेस्त्री याच्या ताब्यात देण्यात आला आहे. तर आठ वर्षाच्या मुलाला सावंतवाडी येथे बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.