शिक्षणमंत्री गुन्हेगार आहेत का..?

▪️ अण्णांचा जिल्हाधिकाऱ्यांंना सवाल ▪️ पोलिस खात्याकडून बदनाम करण्याच छडयंत्र : वसंत केसरकर
Edited by: विनायक गावस
Published on: April 01, 2024 11:23 AM
views 93  views

सावंतवाडी : जामिनावर मुक्तता झालेल्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि कोणत्याही वेळी, खास करून निवडणूक कालावधीमध्ये दंगलीत समावेश असलेल्या व्यक्तींना शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तालुक्यातील १३ जणांची यादीमध्ये नावे शस्त्र परवानाधारक असलेल्या माझ्यासह शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचेही नाव आहे. ही नोटीस आम्हाला देण्याच हे छडयंत्र आहे. गृहखात कुणाच्या ताब्यात आहे ? हे विशिष्ट लोक आम्हाला बदनाम करण्याच काम करत आहे. कुठल्याही भांडणात नसणारे शिक्षणमंत्री यांचही नाव या यादीत समाविष्ट केल जात,  नाहक त्यांना गोवल जात हे दुर्दैवी आहे असं मत ज्येष्ठ नेते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी व्यक्त केले आहे. ‌तर बंदूका चुकीचा पद्धतीने जमा करून घेतल्यास व त्यानंतर आमच्या जीवीताला धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार पोलिस प्रशासन रहाणार का? असा खडा सवाल देखील त्यांनी केला. 

अण्णा केसरकर म्हणाले, देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून जिल्हाधिकारी यांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नोटीस बजावली आहे. ज्यांच्याजवळ शस्त्र परवाना आहे अशा शस्त्र धारकांनी आपली शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करावी अशी नोटीस आम्हाला बजावली आहे. तालुक्यातील 250 पैकी 13 जणांना ही नोटीस बजावली आहे. निवडणूक कालावधीत शस्त्र वापरण्यात बंधन घालणे यासाठी जामीनावर मुक्त झालेल्या व्यक्ती, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्ती व निवडणूक कालावधीत दंगलीत समाविष्ट व्यक्ती याप्रमाणे पोलीस अधीक्षकांनी शस्त्र जमा करण्याची नोटीस जिल्हाधिकारी यांच्याद्वारे बजावली. ही नोटीस चुकीच्या पद्धतीने बजावली आहे. गेली 60 वर्ष सामाजिक काम करताना शांतता राखण्याच काम मी केले आहे. नोटीसीत उल्लेख केलेल्या कोणत्याही गोष्टीत माझा समावेश नाही. मी शस्त्राच्या कोणत्या गुन्ह्यात सहभागी नाही. कुणाला शस्त्राचा धाक, दुखापत केली नाही. तसे माझ्यावर आरोप नाही अथवा जामीनावर देखील बाहेर नाहीत. असे असताना हेतुपुरस्सर बदनाम करण्याच  छडयंत्र या मागे आहे. 250 पैकी 13 नावांची शिफारस पोलिस अधिक्षकांनी केली आहे. 13 लोकांत असणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर गुन्हेगार आहेत का ? त्यांचही नाव गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या यादीत समाविष्ट केल आहे. मुंबई कोर्टान गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या व परवाना धारक असलेल्यांना त्रास देऊ नये, मानहानी करू नये असे निर्देश दिले आहेत. अस असताना पोलीस खात्यानं मला बदनाम करण्याच काम केले आहे. सज्जन प्रामाणिक माणसांना बदनाम केल जात आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे याबद्दल आक्षेप नोंदविला आहे. आमच्या बंदूका चुकीचा पद्धतीने जमा करून घेतल्यास व त्यानंतर आमच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार पोलिस प्रशासन रहाणार का? संरक्षणासाठी आम्ही व तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे शस्त्र परवाने घेतलेत. चुकीच्या यादीत बसविण्याच काम आम्हाला केल जात आहे. हुकूमशाहीच्या दिशेन हा कारभार चालू आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत लेखी उत्तर न दिल्यास अथवा या नोटीसा मागे न घेतल्यास आंदोलनात्मक पाऊल उचलाव लागेल, जेलमध्ये घातलत तरी त्याची पर्वा करत नाही, मरणाला घाबरत नाही असा इशारा अण्णा केसरकर यांनी दिला.