
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा, पणदूर,वेताळबांबर्डे येथील रस्त्याची पुन्हा एकदा चाळण झाली असून, या मार्गावरील प्रवाशांचे हाल वाढले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, दुरुस्तीच्या नावाखाली केवळ कंत्राटदार आपले खिसे भरत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.
जीव धोक्यात, वाहनांचा खर्च ही वाढला !
या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे केवळ प्रवाशांचा जीव धोक्यात येत नाही, तर वाहनांच्या दुरुस्तीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सततच्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी' खाणे कधी थांबणार ?
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक संतप्त झाले असून, त्यांची तीव्र प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम खात्यावर उमटत आहे. "रस्त्याची दुरुस्ती न करता, केवळ वेळखाऊ पण करण्याचा पवित्रा केव्हा सोडणार. 'मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणे' सार्वजनिक बांधकाम खाते आता तरी बंद करणार का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे !
जनतेची ही समस्या गंभीर असल्याने, स्थानिक आमदार आणि पालकमंत्री यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने रस्त्याची गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जनतेच्या या तीव्र भावना आणि संतप्त प्रश्नांवर सार्वजनिक बांधकाम खाते काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.










