प्रसाद लोके खून - मनवा लोके आत्महत्या प्रकरणाचा तपास CID कडे वर्ग करा : आ. नितेश राणे

जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना निवेदन देत केली मागणी
Edited by:
Published on: September 26, 2023 15:56 PM
views 659  views

सिंधुदुर्ग : देवगड मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके खून प्रकरण, तसेच मनवा प्रसाद लोके आत्महत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा अशी मागणी एका पत्राद्वारे भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.

देवगड तालुक्यातील प्रसाद परशुराम लोके याचा खून दिनांक १८/९/२०२३ रोजी तालुक्यातील मुणगे - मशवी रस्त्यावर निर्जनस्थळी झाला आहे. सदरहू खून प्रकरणी तपास सुरू असतानाच कै. प्रसाद परशुराम लोके याची पत्नी मनवा प्रसाद लोके हिने दिनांक २१/९/२०२३ रोजी गळफास लावून आत्महत्या केलेली होती. या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून सद्या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. या खून प्रकरणातील मुख्य संशयित  किशोर पवार हा ब्रेन ट्युमर या आजाराने त्रस्त असल्याने त्याचेवर उपचार सुरू आहेत.

अशा परिस्थितीमध्ये या गुन्ह्याचा तपास योग्य रितीने होऊन आरोपींवर गुन्हा दाखल होऊन न्यायालयाकडून कठोर शिक्षा व्हावी, अशी समस्त देवगड वासीयांची भावना आहे. या गुन्ह्याचे स्वरूप व विस्तार मोठ्या प्रमाणात असल्याने व यामध्ये अनेक आरोपींचा सहभाग असल्याने हा तपास लवकरात लवकर व्हावा, यासाठी जनतेने केलेल्या मागणीचा विचार करून तपास सीआयडी मार्फत करण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना दिले आहे.