वेंगुर्ल्यातील कागदपत्र चोरी प्रकरणात काही राजकीय नेत्यांचे हितसंबंध | संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी

Edited by: दिपेश परब
Published on: June 13, 2023 20:02 PM
views 82  views

वेंगुर्ला : येथील जुन्या तहसिलदार कार्यालयाच्या बाजूला असलेल्या शहर तलाठी कार्यालयाच्या जुन्या स्टोरेज कॉटर्स मधून जमिनीची फेरफार असलेली महत्वाची कागद पत्रे चोरीस गेलेली आहेत. दरम्यान याबाबत योग्य ती चौकशी होऊन तात्काळ संबंधित आरोपीवर कारवाई करण्यात यावी याबाबत वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ला पोलीस ठाण्याला व वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले. 

या निवेदनात असे म्हटले आहे की,  दिनांक ४ जून २०२३ च्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार जुन्या कागदपत्रांची चोरी २६ मे ते १ जून या कालावधीमध्ये झाल्याचे समजते परंतू या महत्त्वाच्या चोरी प्रकरणामध्ये काही राजकीय नेत्यांचे हितसंबंध असल्याचा दाट संक्षय दिसून येत आहे. त्यामुळे सदर प्रकरणामध्ये संबंधीत कर्मचारी व त्याच्याशी लागेबंधे असलेल्या राजकिय पुढा-यांची कसून चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा आपल्या कार्यालया समोर धरणे 'आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख यशवंत परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहरप्रमुख अजित राऊळ, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, मनोहर येरम, उमेश नाईक यांच्यासहित इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.