
सावंतवाडी : महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट, प्रीपेड व टीओडी मीटरच्या विरोधात सावंतवाडीत तीव्र आंदोलन उभे राहिले आहे. ग्राहकांना आर्थिक संकटात लोटणाऱ्या या निर्णयाविरोधात विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेने आजपासून सावंतवाडी महावितरण कार्यालयासमोर साखळी उपोषणला मंगेश तळवणेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटनेचा यावेळी जाहीर पाठिंबा दिला आहे.दरम्यान मागील महिन्यात संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ महावितरण कार्यालयावर झालेल्या मोर्चानंतर प्रशासनाने स्मार्ट, प्रीपेड आणि टीओडी मीटर बसवणार नाही, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन धाब्यावर बसवत शहरी व ग्रामीण भागात २,००० हून अधिक स्मार्ट मीटर गुपचूप बसवण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
स्मार्ट मीटरमुळे वीज बिल चारपट वाढणार असून, प्रीपेड प्रणालीमुळे आर्थिक संकट वाढणार आहे. ग्राहकांनी वेळेवर रिचार्ज न केल्यास वीजपुरवठा थांबणार असल्याने अनेक कुटुंबे अंधारात राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे या प्रकाराला नागरिकांकडून जोरदार विरोध होत आहे. ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराचा स्पष्ट अंदाज यावा, यासाठी पूर्वीप्रमाणेच रीडिंग मीटर बसवावे, अशी मागणी केली जात आहे. याशिवाय, ग्राहकांना विश्वासात न घेता मीटर बसवण्याचा प्रकार हा लोकशाहीविरोधी आणि अन्यायकारक आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.महावितरणच्या या अघोरी निर्णयाविरोधात विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेतर्फे आज १२ मार्च पासून सावंतवाडी महावितरण कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आला आहे. जर महावितरणने याकडे दुर्लक्ष केले तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.यावेळी संजय लाड अध्यक्ष, बाळासाहेब बोर्डेकर उपाध्यक्ष, सचिव दीपक पटेकर, तालुका उपाध्यक्ष पुंडलिक दळवी, संतोष तावडे आदींनी पाठिंबा दर्शविला आहे.