कणकवली बाजारपेठेत रस्त्यावरील अतिक्रमणांची पाहणी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 16, 2025 18:34 PM
views 1352  views

कणकवली : कणकवली बाजारपेठेत रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांबाबत सोमवारी सायंकाळी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या सह पोलीस निरीक्षक मारुती जगताप व व्यापारी संघाच्या प्रतिनिधींनी बाजारपेठेतील अतिक्रमणांची संयुक्त पाहणी केली. तर लवकरच रस्त्याची मोजणी होणार असून त्यानंतर अतिक्रमणधारकांना लेखी नोटिसा देण्यात येतील व त्यानंतरच अतिक्रमणे हटविली जातील अशी माहिती मुख्याधिकारी पाटील यांनी दिली.

पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृहात व्यापारी व नागरिकांसह वेत झालेल्या बैठकीमध्ये कणकवली बाजारपेठेतील अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आला होता.  सदरची अतिक्रमणे हटविण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. त्यानंतर अतिक्रमणाबाबत सोमवारी पाहणी करणार असल्याचे न. पं. प्रशासन व पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली.

पाहणी दरम्यान व्यापारी संघाचे राजू पारकर, विलास कोरगावकर, राजेश राज्याध्यक्ष, दीपक बेलवलकर, शेखर गणपत्ये यांच्यासह नगरपंचायतचे रवी महाडेश्वर, प्रशांत राणे, तुषार कांबळे अन्य उपस्थित होते. कणकवली मुख्य चौक येथून रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांची पाहणी केली व सूचना दिल्या.‌ कारवाई होणार या शक्यतेने सकाळपासूनच अनेक दुकानदारांनी आपली दुकाने गटाराच्या आत मध्ये लावलेले चित्र सकाळपासून दिसत होते. मुख्य चौक ते तेली आळी इथपर्यंत अतिक्रमणांची पाहणी करण्यात आली.