
वैभववाडी : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातुन कोट्यावधीची कामे शहरात केली जात आहेत.परंतु ती कामे दर्जाहीन होत आहेत. शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होत आहे. या सर्व कामांची चौकशी करावी अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे.
श्री लोके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैभववाडीच्या विकासाकरीता पालकमंत्री नितेश राणेंनी कोट्यावधी रूपयांचा निधी नगरपंचायतीला दिला आहे. या निधीतुन रस्ते,गटारे आणि इतर विकासकामे केली जात आहेत. वैभववाडी शहरात सुरूवातीला दत्तमंदीर ते सावली हॉटेल आणि सावली हॉटेल ते नारायण वडापाव सेंटर हे गटारकाम करण्यात आले. याशिवाय नगरपंचायत ते सांगुळवाडी रस्ता, आणि आता नव्याने भरपावसात बसस्थानक ते संभाजी चौक असे नवीन गटाराचे बांधकाम सुरू आहे. कोटी ते दीड कोटी रूपये गटार बांधकामावर खर्च झाले आहेत. परंतु बांधकाम केलेल्या गटारातुन पाणीच वाहत नसल्याचे दिसुन येत आहे. गटारातुन पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पहील्याच पावसात शहर तुंबले आहे.गुडघाभर पाणी शहराच्या काही भागात साचलेले आहे. नियोजनशुन्य कारभारामुळे वैभववाडी शहरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाऊस सुरू असताना कामे केली जात असल्याने सर्व शहरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. गटारांची कामे देखील निकृष्ट पध्दतीने सुरू आहेत. गटारालगतच नळपाणी पुरवठा योजनेची जलवाहीनी घातली आहे. त्यामुळे भविष्यात अनेक समस्या शहरातील नागरिकांसमोर निर्माण होणार आहेत.
त्यामुळे बांधकाम केलेल्या गटारातुन जोपर्यत पाणी जाऊन लोकांची समस्या सुटत नाही तोपर्यत ठेकेदारांना बिले अदा करू नये अशी मागणी श्री.लोके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याशिवाय वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातुन शहरात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करावी, तसेच नगरपंचायतीने केलेल्या कामांची पाहणी करावी अशी देखील मागणी श्री.लोके यांनी केली आहे.
येत्या काही दिवसांत यासंदर्भात ठोस कार्यवाही झाली नाही तर या सर्व प्रकाराविरोधात आम्ही आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.नगरविकास अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले आहे.