
देवगड : जागतिक महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक ऐतिहासिक दिवस आहे. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत एका अभिनव पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक सुनील जाधव व महिला शिक्षकांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.
या प्रसंगी विचारमंचावर मुख्याध्यापक सुनील जाधव, समीरा राऊत, प्रज्ञा चव्हाण, संजीवनी जाधव, मानसी मुणगेकर, संजीवनी धोंगडे, गोखले मॅडम, प्रणाली वायंगणकर, कुमारी खरात आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी स्त्रीच्या कर्तृत्वाचा गौरव करून मुलांसमोर तिच्या प्रगतीचे विविध कंगोरे उलगडून सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना संजीवनी जाधव यांनी प्राचीन व आधुनिक काळातील महिलांची बदलती विविध रूपे विद्यार्थ्यांसमोर मांडली. याप्रसंगी प्रज्ञा कांबळी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी इयत्ता नववी ब च्या विद्यार्थिनीनी महिलांचे कर्तृत्व सिद्ध करणारी नृत्यकला सादर करून उपस्थितांकडून वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे संयोजन मानसी मुणगेकर मॅडम यांनी केले.