
देवगड : देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूल मधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी 'माझी वही माझी ओळख' असा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील उपक्रमशील इतिहास विषय शिक्षिका सौ. आफरीन पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी इतिहास विषयाच्या वहीच्या मुखपृष्ठावर स्वतःचे प्रथम नाव व त्या नावाचा अर्थ आणि त्याखाली आपण ज्या गावांमध्ये राहतो त्या गावाला नाव कसे पडले याची माहिती शोधून ती मुखपृष्ठावर प्रदर्शित केले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना स्वतःच्या नावाचा अर्थ कळण्याबरोबरच आपण ज्या गावांमध्ये राहतो त्या गावाला ते नाव का देण्यात आले कोणत्या वैशिष्ट्यांमुळे देण्यात आले याची माहिती मिळवून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली. या उपक्रमाचे कौतुक पालक वर्गातून तसेच शिक्षक वर्गातून होत आहे.










