
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला राजकोट छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी घटनास्थळी दाखल झाले. शिवप्रेमी सुद्धा आक्रमक बनल्याने राजकोट किल्ल्यानजिक पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच आमदार वैभव नाईक यांनी राजकोट येथे जाऊन पाहणी केली. घडलेली घटना दुर्दैवी असून शिवसप्रेमींना शांततेच आवाहन केले आहे. मात्र,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीचं काम निकृष्ट दर्जाचे झाले असून दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली.
नौसेना दिनाचे औचित्य साधून 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. नौदलाच्या वतीने हे काम करण्यात आले होते. लोकार्पणा नांतर लाखो शिवप्रेमी यांनी या राजकोट किल्ल्याला भेट दिली होती.
अनेक दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस मालवणात कोसळत आहे. आज सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा कोसळला. या घटने नंतर प्रशासनाने तात्काळ दाखल होत मदतकार्य सुरु केले. तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.