
दोडामार्ग : मागील विधानसभा निवडणुकीत आडाळी एमआयडीसीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवणाऱ्या आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीने पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. भूखंड वाटप प्रक्रिया अचानक रद्द केल्यामुळे उद्योजकांचा हिरमोड झाला असून ही प्रक्रिया तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी समितीने केली आहे.
सरपंच पराग गांवकर व समितीचे सचिव प्रवीण गांवकर यांनी याप्रशनी आक्रमक भूमिका घेतली असून दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ते भेटी घेऊन हा मुद्दा त्यांच्या पर्यंत पोहोचविणार येणार आहेत. आडाळी एमआयडीसीत उद्योग येण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याबाबत त्यांच्या मनात खंत आहे.
किमान भूखंड मागणी केलेल्या उद्योजकांना वेळेवर भूखंड वाटप न करता केली जाणारी दिरंगाई टाळावी. आडाळीचे औद्योगिक महत्त्व उद्योजकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाहीय. मागील निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी या प्रश्नावर आश्वासने दिली होती; परंतु वर्ष उलटल्यानंतरही ठोस काम झाल्याचे दिसत नाही, अशी टीका समितीने केली आहे.
सत्ताधारी पक्षांसोबतच विरोधकांनीही हा मुद्दा सातत्याने चर्चेत ठेवावा, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन व महामंडळ यांच्याकडे प्रयत्न व्हावेत, भूखंडधारक उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यात याव्यात, यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन लवकरच पुढील आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल, असा इशाराही समितीने दिला आहे.










