भारत २०४७ पर्यंत महासत्ता बनेल

डॉ. उदय निरगुडकरांचा विश्वास
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 14, 2026 14:30 PM
views 88  views

स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला 

कणकवली : भारताकडे प्रचंड प्रतिभा, ज्ञानपरंपरा आणि उद्योजकतेची ताकद आहे. ही ताकद योग्य दिशेने वापरली तर २०४७ पर्यंत भारत महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार व व्याख्याते डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केला. आपण इतके सक्षम बनूया की एक दिवस अमेरिकेचे‌ दुतवास हे भारतीय दुतवासासमोर बुद्धिमत्तेसाठी रांग लावून उभे असतील, असेही ते म्हणाले.

कणकवलीतील प्रहार भवन येथे आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत 'भारत महासत्ता होताना युवकांची भूमिका' या विषयावर डॉ. निरगुडकर बोलत होते. निरगुडकर यांनी भारताचा इतिहास, गुलामगिरी, आर्थिक बदल, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, डिजिटल क्रांती आणि युवकांची जबाबदारी यावर प्रभावी भाष्य केले.

दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान चर्चिल शरणागतीचा विचार करत होते. मात्र ब्रिटनची जनता लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहिली आणि त्यानंतर चर्चिल यांनी शरणागतीचे पत्र फाडून युद्धाचा निर्णय घेतला. “जेव्हा जनता ठरवते, तेव्हा इतिहास बदलतो,” असे ते म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरही मराठ्यांनी महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाविरुद्ध २७ वर्षे संघर्ष केला . परिणामी औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या भूमीत मरण पत्करावे लागले,याची आठवण करून देत त्यांनी मराठी मावळ्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. मात्र प्लासीच्या युद्धानंतर भारत गुलाम बनला आणि १९० वर्षे परकीय सत्तेखाली राहिला, असेही त्यांनी नमूद केले.

भारताची पारंपरिक ज्ञानपरंपरा आणि व्यापारशक्ती यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, १७५० साली जागतिक व्यापारात भारताचा वाटा तब्बल २३ टक्के होता. देशातील जहाजबांधणी, उद्योग आणि व्यापार इतका प्रगत होता की अनेक देशांची जहाजे भारतीय बंदरांवर येत असत. मात्र इंग्रजांच्या शिक्षणपद्धतीने भारतीयांची उद्योगशीलता नष्ट केली आणि देश आर्थिकदृष्ट्या मागे गेला, असे त्यांनी स्पष्ट केले.

“१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचा जागतिक व्यापारातील वाटा २३ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला होता. १९९१ मध्ये तर देशाला सोने गहाण ठेवण्याची वेळ आली होती,” असे सांगत त्यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर भारताने आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून मोठी झेप घेतल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या आयटी क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची स्थापना करणारे फकीर कोहली यांचे उदाहरण दिले. “भारतातील सॉफ्टवेअर निर्यात आज सौदी अरेबियाच्या तेल निर्यातीपेक्षाही अधिक आहे,” असे ते म्हणाले.

डिजिटल क्रांतीवर बोलताना त्यांनी सांगितले की, भारतात जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, मोबाईल तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवहारांमुळे सामान्य माणसाचे जीवन बदलत आहे. “हे एक सायलेंट रेव्होल्यूशन आहे,” असे त्यांनी नमूद केले.

तरुणांच्या नव कल्पनांचा उल्लेख करताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. रक्त न घेता हिमोग्लोबिन तपासणारे मशीन, कमी खर्चातील कृत्रिम हात, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मशीन, ग्रामीण भागासाठी आरोग्यविषयक ॲप्स, कोरोना टेस्टिंग किट, सुपर कॉम्प्युटर, मंगळयान आणि स्वदेशी संशोधन यामुळे भारताची क्षमता जगासमोर आल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात भारताने विक्रमी वेळेत टेस्टिंग किट आणि लस तयार केली. “भारतीय महिलांनी या संशोधनात मोठे योगदान दिले. सामान्य कुटुंबातील युवक-युवती देशासाठी जागतिक दर्जाचे संशोधन करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.

“इंटरनेटवर ज्याचे नियंत्रण, त्याचे जगावर नियंत्रण,” असे सांगत त्यांनी युवकांनी सोशल मीडियाचा वापर केवळ स्टेटस टाकण्यासाठी नव्हे, तर समाजकारण, व्यवसाय आणि नवकल्पनांसाठी करावा, असे आवाहन केले. मुंबईतील डबेवाले, भारतीय स्टार्टअप्स, मंगळयान मोहिम आणि स्वदेशी सुपर कॉम्प्युटर यांचा उल्लेख करत त्यांनी भारताच्या काटकसरी, व्यवस्थापन कौशल्य आणि संशोधनक्षमतेचे कौतुक केले.

“भारताकडे टॅलेंटची कमतरता नाही. गरज आहे ती जिद्दीची, सकारात्मकतेची आणि योग्य दिशेची,” असे सांगताना त्यांनी युवकांना “जॉब सीकर” न राहता “जॉब क्रिएटर” बनण्याचे आवाहन केले.ज्ञ“जेव्हा समाजाला वाटेल की आपला देश जगात नंबर वन झाला पाहिजे, तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनेल,” असे सांगत त्यांनी २०४७ पर्यंत विकसित आणि महासत्ता भारत घडविण्यात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.


भारताच्या प्रगतीत प्रत्येकाने हातभार लावा : नारायण राणे 

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे म्हणाले, व्याख्यानातून केवळ शब्द ऐकायचे नसतात, तर त्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन आयुष्यात त्याची अंमलबजावणी करायची असते. डॉ. उदय निरगुडकर यांनी युवकांना जिल्हा, महाराष्ट्र आणि देशासाठी मोठे योगदान देता येऊ शकते, हा विश्वास त्यांच्या प्रभावी शब्दांत दिला. भारत प्रगत देशाकडे वाटचाल करत असून त्या प्रवासात प्रत्येकाने आपला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन युवकांनी देशाच्या विकासासाठी काम करावे, असे मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले.