अतुल्य भारत रोलर स्केटिंग यात्रेचे फोंडाघाट येथे जल्लोषात स्वागत

काश्मीर ते कन्याकुमारी करताहेत स्केटिंग
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 01, 2022 16:55 PM
views 157  views

कणकवली : वाराणसी रोलर स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आलेली अतुल्य भारत रोलर स्केटिंग यात्रेचे इक्विटी फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग, या संस्थेचे अध्यक्ष रामदास सांगवेकर, सेक्रेटरी ज्ञानेश चिंदरकर, ज्येष्ठ पत्रकार काका करंबेळकर आणि ब्रह्मनगरी फोंडाघाट ग्रामस्थांतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले.

या अतुल्य भारत रोलर स्केटिंग यात्रेचे संयोजक राजेश डोगरा यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रभावित होऊन 'एक भारत श्रेष्ठ भारत'  अंतर्गत एक साहसी नारी शक्ती तर्फे याचे आयोजन करण्यात आले असून या यात्रे दरम्यान १३ राज्यांमधून हा प्रवास होणार असून दिनांक २७ सप्टेंबर २०२२ पासून श्रीनगर लाल चौक ते कन्याकुमारीपर्यंत जवळपास पाच हजार किलोमीटरची ही स्केटिंग यात्रा केली जाणार असून जवळपास ९० दिवसांचा हा प्रवास असणार आहे.

 या स्केटिंग प्रवासा दरम्यान महिला सशक्तीकरण, वृक्षारोपण, संघटित भारतचा संदेश दिला जाणार आहे. या यात्रेमध्ये पाच दिवस पाच रात्र म्हणजे सलग १२६  तास ५ मिनिटे स्केट प्रवास करून जागतिक रेकॉर्ड बनविणारी आणि २०१५ मध्ये सलग २४ तास स्केट करून रेकॉर्ड बनविणारी सोनी चौरसिया यांसह आठ महिला चार पुरुष सतत स्केटिंग यात्रा करत आहेत व इतर आठ असे एकूण २० जणांकडून ही अतुल्य भारत रोलर स्केटिंग यात्रा पार पाडली जात आहे.

 बुधवारी फोंडाघाट येथे पोहोचलेली रोलर स्केटिंग यात्रा रामदास सांगवेकर यांच्या निवासस्थानी थांबली. गुरुवारी सकाळी मालवण,गोवा, कर्नाटक, केरळ करत कन्याकुमारीला दिनांक २५  डिसेंबरपर्यंत पोहोचणार आणि फोंडाघाटमध्ये पोहोचलेल्या या अतुल्य भारत रोलर स्केटिंग यात्रेचे स्वागत करण्यासाठी ब्रह्मनगरीतील ग्रामस्थ सहदेव यांनी प्रवीण हिंदळेकर, संतोष सावंत, सौ. करुणा चिंदरकर यांसह फोंडाघाटमधील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.