
देवगड: देवगड तालुक्यातील मुणगे येथील भंडारवाडी ग्रामस्थांनी कै. समीर सुधीर मुणगेकर यांच्या स्मरणार्थ गावातील रुग्णसेवेसाठी एक ईसीजी (विद्युत हृदयलेख) मशीन भेट दिली आहे. या मशीनमुळे आता श्री दत्त कृपा क्लिनिकमध्ये अत्यंत माफक दरात ईसीजी काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. दिगंबर पेडणेकर यांच्या हस्ते हे ईसीजी मशीन डॉ. सुजित कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी डॉ. के. एन. नायसे आणि डॉ. सुजित कदम यांनी भंडारवाडी ग्रामस्थांचे या महत्त्वपूर्ण देणगीबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी डॉ. के. एन. नायसे, माजी सरपंच सौ. साक्षी गुरव, मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, पोलीस पाटील सौ. साक्षी सावंत, देवदत्त पुजारे, देवस्थान उपाध्यक्ष सुधीर महाजन, सचिव निषाद परुळेकर, मनोज सावंत, युवा उद्योजक अनुप मुणगेकर, विनय मुणगेकर, सतीश पेडणेकर, सुदीप मुणगेकर, बाबा मेस्त्री, दादा वळंजू यांसह भंडारवाडी येथील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाने मुणगे गावाच्या आरोग्यसेवेत मोलाची भर पडली आहे.