श्री क्षेत्र परशुराम येथील प्रलंबित कामांसाठी वाढीव निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तत्परता | आ. शेखर निकम यांचेसोबत विश्वस्तांनी घेतली मंत्रालयात भेट | २ कोटी ४३ लाखांचा निधी मंजूर
Edited by: मनोज पवार
Published on: February 14, 2025 18:17 PM
views 151  views

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील श्री क्षेत्र परशुराम येथील देवस्थान ट्रस्टच्यावतीने जिल्हा नियोजनमधून सुरू असलेल्या प्रलंबित कामांबाबत विश्वस्तांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची भेट घेतली. प्रलंबित कामांसाठी जिल्हा नियोजनमधून अजित पवार यांनी २ कोटी ४३ लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला. अवघ्या काही तासातच ३३ लाखांची प्रशासकीय मंजुरी दिली आणि विश्वसांच्या हातात तशी ऑर्डरही आली. उर्वरित निधी मार्चनंतर मिळेल, असेही अजित पवार म्हणाले.

अजितदादांच्या कामाचा धडाका, तत्परता, प्रशासनावरील वचक, याचा अनुभव भगवान श्री परशुराम देवस्थानच्या ट्रस्टींनी घेतला. चिपळूण तालुक्यातील श्री क्षेत्र परशुराम येथे सुरु असलेली जिल्हा नियोजनमधील काही कामे प्रलंबित आहेत. सांस्कृतिक भवन बांधून तयार आहे. मात्र अंतर्गत इतर कामे येत्या दोन-तीन वर्षांपासून रखडली आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. जीवन रेळेकर, विश्वस्त उद्योजक राजू जोशी, विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन, व्यवस्थापक शंकर कानडे, तांत्रिक सल्लागार रामचंद्र वडके, अॅड. प्रथमेश रेळेकर यांनी मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेतली. यावेळी सोबत  चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार  शेखर निकम हेही उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजितदादांनी तत्काळ हा विषय समजून घेतला व यापूर्वीच माझ्या कडे का आला नाहीत, असा आपुलीकीने सवालही विश्वस्तांना केला.  तातडीने अजितदादांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांना फोन केला व वाढीव निधीला मंजुरी देत असल्याचे सांगितले. मी रत्नागिरीचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ना. उदय सामंत यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले, त्यानंतर ३३ लाखांच्या निधीची प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि हा निधी मंजूर झाल्याची ऑर्डरही विश्वस्तांच्या हातात काही तासात मिळाली. ना. अजितदादांच्या या धडाकेबाज कामाचा अनुभव परशुराम देवस्थान ट्रस्ट्रच्या विश्वस्तांनी घेतला.