विद्यार्थ्यांसाठी मानव विकास गाड्यांच्या ५ फे-या वाढवल्या

जयेंद्र रावराणे यांच्या मागणीला यश | शिक्षण संस्थेचे आजच चक्काजाम आंदोलन स्थगित
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 31, 2023 19:55 PM
views 535  views

वैभववाडी : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मानव विकास गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केलेली मागणी एसटी प्रशासनाने मान्य केली.या नविन ५फे-यांचा शुभारंभ तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या उपस्थित संपन्न झाला.यानंतर शिक्षण संस्थेच्यावतीने आजच  चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आले.

तालुक्यातील विविध गावांतून शाळकरी विद्यार्थी शहरातील अर्जून रावराणे विद्यालय, हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयासहीत आचिर्णे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात.या विद्यार्थ्यांकरिता शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत ७गाड्या मंजूर आहेत.मात्र गेल्या काही दिवसांपासून या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते.अनेक गाड्या उशिराने धावत होत्या.यासंदर्भात वैभववाडी शिक्षण संस्थेने एसटी महामंडळाचे लक्ष वेधले होते.तसेच नव्याने ५फे-या वाढवून मिळाव्यात अशी मागणी केली होती.मात्र एसटी प्रशासनाकडून त्यांची पुर्तता न झाल्याने चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.यानंतर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले.आंदोलनाच्या इशा-यानंतर तहसीलदार यांनी याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांशी दुरध्वनीद्वारे संवाद साधला.तसेच याबाबत आ. नितेश राणे यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

त्यानंतर एसटी महामंडळाच्यावतीने ह्या मागण्या मान्य करण्यात आल्या.नव्याने ५ फे-या मंजूर करण्यात आल्या.तसेच सर्व गाड्या वेळेत पोहतील असं आश्वासन दिले.यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी नव्याने सोडण्यात आलेल्या गाड्यांचा तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या हस्ते शुभारंभ झाला.यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे,आगार व्यवस्थापक वैभव पडोले, वाहतूक नियंत्रक बाबू गुरखे, मुख्याध्यापक भास्कर नादकर व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.