
सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात काही मोजक्याच गाड्या थांबत असल्याने रिक्षा चालक व मालकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. २०१५ ला सावंतवाडी टर्मिनस जाहीर झाले असले तरीही अद्याप ते अस्तित्वात नाही आहे. अनेक एक्सप्रेस गाड्यांना येथे थांबेच नसल्यामुळे व असणाऱ्या गाड्या गोव्यातूनच भरून येत असल्यानं स्थानिक प्रवाशांना कुडाळला जावं लागतं. त्यामुळे स्थानकातील रिक्षा व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यामुळे सावंतवाडी स्थानकात जास्तीत जास्त रेल्वे गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी रिक्षा व्यवसायिकांनी भाजप नेते, माजी आमदार राजन तेली यांच्याकडे केली आहे.
सावंतवाडी रोड स्थानक परिसराचे सुशोभीकरण व रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने माजी आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली सावंतवाडी स्थानकात आले होते. यावेळी रिक्षा व्यवसायिकांनी राजन तेली यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी रिक्षाचालक प्रदीप सोनुर्लेकर, भाऊ कांबळी, सहदेव सामंत, श्याम सांगेलकर, दिनेश कुडव, अजित सातार्डेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी टर्मिनस घोषणा करण्यात आली मात्र ते पूर्णत्वास आलेल नाही. त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांना येथे थांबा मिळत नाही. याचा फटका स्थानिक रिक्षाव्यवसायिकांना बसत आहे.
जनशताब्दी, कोकणकन्या, मांडवी, तुतारी व दिवा पेसेंजर यासारख्या काही मोजक्या गाड्या वगळता या स्थानकात गाड्यांना थांबा नसल्यामुळे रिक्षाव्यवसायिक अडचणीत आले आहेत. या गाड्या गोव्यातूनच भरून येत असल्यानं स्थानिक लोकांना कुडाळ स्थानकाचा पर्याय निवडावा लागतो. अन्य एक्सप्रेसना सावंतवाडीत थांबा नसल्यानं कुडाळला जावं लागत.
यापूर्वी राजधानी एक्सप्रेस, गरिब रथ, मडगांव नागपूर या गाड्यांना येथे थांबा होता. मात्र तो देखील आता बंद करण्यात आला आहे. अलीकडेच सुरू झालेल्या वंदे भारत गाडीला देखील या ठिकाणी थांबा देण्यात आला नाही. इतर जिल्ह्यात दोन ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस थांबते. मात्र, सिंधुदुर्गत केवळ एकच थांबा देण्यात आला आहे.
त्यामुळे मंगला, नेत्रावती तसेच मडगांव नागपूर यासारख्या एक्सप्रेस गाड्यांना सावंतवाडीत थांबे देण्यात यावेत व टर्मिनसचे काम देखील पूर्ण करावे अशी मागणी यावेळी रिक्षा व्यवसायिकांनी केली. दरम्यान, याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून सावंतवाडी टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच गाड्यांना थांबे मिळण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करेन अशी ग्वाही राजन तेली यांनी रिक्षाव्यवसायिकांना दिली.तर आपल्या रिक्षावर 'वंदे भारत ' असे लिहून भारतभूमी प्रती भारतीय रेल्वे प्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या सहदेव सामंत या रिक्षा व्यावसायिकाचे राजन तेली यांनी विशेष कौतुक केले.