
सावंतवाडी : आजच्या बदलत्या परिस्थितीत स्वतःला वाटणार्या भावना नक्की कोणत्या, त्या कशा हाताळायच्या, समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना कोणत्या, त्यांना योग्य प्रतिसाद कसा द्यायचा, ही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. रुपेश पाटकर यांनी केले. ते सध्या प्रा. गोपाळराव दुखंडे प्रबोधनमालेद्वारे सावंतवाडी तालुक्यातील कुमारवयीन मुलांशी संवाद साधत आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध शाळांतून वीस व्याख्याने दिली आहेत.
आपल्या मुद्दा समजावून देताना डॉ. पाटकर यांनी सांगितले की प्रेम, आकर्षण आणि वासना तीन भिन्न भावना असल्या तरी विविध माध्यामातून त्यांना 'प्रेम' असे मांडण्यात येते. त्यामुळे कुमारवयीन मुले याबाबत गल्लत करू शकतात. या तिन्ही भावना जरी नैसर्गिक असल्या तरी त्या आपण योग्य तर्हेने हाताळू शकलो नाही तर दुसऱ्याकडून त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. डॉ पाटकर पुढे म्हणाले की याबाबत मुलींनाच फसवले जाण्याची शक्यता असते असे नाही, मुलांना देखील फसवले जाऊ शकते.

भावनिक बुद्धिमत्तेसोबतच मुलांनी ॲसरटीव्ह व्हायला शिकले पाहीजे. पियर प्रेशरला बळी पडायचे नसेल तर 'ॲसरटीव्ह' होणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुलेंसारख्या मंडळींकडून आपण 'पटत नाही ते ठामपणे नाकारायला' शिकले पाहीजे असे ते म्हणाले.

कुमारवय हे स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून घेण्याचे वय आहे. क्षमतांची जाणीव जशी वाढत जाते तसतसा आत्मविश्वास वाढत जातो. म्हणुन आपल्या क्षमता ओळखायला शिका, असे त्यांनी सांगितले.

खेळ, चर्चा, अनुभव कथन वगैरे द्वारे मुलांना सहभागी करून घेण्यात आले. पुरोगामी चळवळीत आयुष्य वेचणाऱ्या प्रा. गोपाळराव दुखंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कुमारवयीन मुलांसाठी प्रबोधनमाला आयोजित करण्यात आली होती.

राजे शिवाजी विद्यालय, विलवडे, श्री रवळनाथ विद्यालय, ओटवणे, खेमराज स्मारक विद्यालय, बांदा, विद्याविहार विद्यालय, आरोस, न्यू इंग्लिश स्कूल, मडूरा, व्ही.एन.नाबर हायस्कूल, बांदा, इंसुली हायस्कूल, इंसुली, विनोबा भावे विद्यालय, कुणकेरी, वि.स.खांडेकर हायस्कूल, सावंतवाडी, आर.पी.डी. हायस्कूल, सावंतवाडी, कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी, मळगांव हायस्कूल, मळगाव या विद्यालयात ही व्याख्यानं घेण्यात आली.

आजच्या नव्या पिढीसमोरची आव्हाने लक्षात घेऊन भावनिक बुद्धिमत्तेवर वीस व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. ही प्रबोधनमाला यशस्वी होण्यासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.

