पागमळा येथील गणेश विसर्जनावेळी नागरिकांची गैरसोय

नगर परिषद व्यवस्थापनावर नाराजी
Edited by: मनोज पवार
Published on: September 03, 2025 20:25 PM
views 69  views

चिपळूण : शहरातील पागमळा परिसरात मंगळवारी झालेल्या गणेश विसर्जनावेळी नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. विसर्जनासाठी शिंदे मळ्यासमोरील शिवनदी परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. मात्र नगर परिषदेने आवश्यक ती सुविधा उपलब्ध न करून दिल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली.

या ठिकाणी मारुती मंदिर शेजारील घाटावर सुमारे दीडशेहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गर्दीचा अंदाज घेऊनही नगर परिषदेकडून रस्त्याची योग्य दुरुस्ती, आरतीसाठी सपाटीकरण, तसेच विजेची आवश्यक व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे विसर्जनावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

नागरिकांनी सांगितले की, प्रत्येक वर्षी गणेश विसर्जनावेळी अशीच समस्या उद्भवते. यंदाही पुरेशी तयारी न झाल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागला. “शहरातील प्रमुख घाटावरच जर अशी अवस्था असेल, तर नगरपरिषदेच्या व्यवस्थापनाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहते,” अशी प्रतिक्रिया काही भाविकांनी दिली.

विशेषतः आरतीसाठी सपाट जागा उपलब्ध नसल्याने भाविकांना असुविधा झाली. रात्रीच्या वेळेला प्रकाशयोजनेची कमतरता असल्याने अपघात होण्याची शक्यता होती. नागरिकांनी निदर्शनास आणून दिले की, किमान आनंद चतुर्दशीच्या दिवशी तरी योग्य व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये.