
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ग्रामीण दुर्गम भागातील नागरीकांना पोलीस दलाचा नागरीकांशी थेट संवाद व्हावा त्याचप्रमाणे गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ विषयक डायल 112 हेल्पलाईन, जनजागृती विशेषतः जेष्ठ नागरीक, महिला व बालके यांची सुरक्षा नागरीकांच्या तक्रारीचे त्वरीत निरसण करण्यासाठी दिनांक 09.01.2025 ते दि. 23.01.2025 या कालावधीत ग्रामसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी शिवापुर, ता. कुडाळ येथे ग्रामपंचायत कार्यालय, शिवापुर येथील पंटागणात पार पडला. यावेळी गावाच्या वतीने पारंपारीक पध्दतीने पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी ग्रामस्थांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेण्यात आल्या. यामध्ये पोलीस विभागाव्यतीरीक्त इतर विभागांच्या अडी- अडचणी उपस्थित ग्रामस्थ व महिलांकडुन जाणुन घेवुन त्यासंबधाने संबधीत विभागास पत्रव्यवहार करुन सोडविन्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी आश्वासित केले. तसेच पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी यांनी स्वतःहुन शिवापुर सारख्या दुर्गम गावात येवुन ग्रामस्थांच्या समस्या जाणुन घेतल्या अशी बाब प्रथमच शिवापुर गावामध्ये घडत असल्याचे जाणकार गावकऱ्यांनी सांगितले.या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उपक्रमास शिवापुर गावचे संरपंच, उपसंरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरीक, तलाठी, कोतवाल, ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, माजी सैनिक, जेष्ठ नागरीक, पोलीस पाटील, सेवानिवृत्त पोलीस अमंलदार, ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी, महिला, शिक्षक व मुले सहभागी झाले होते.
त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील रेवंडी गावात, कणकवली तालुक्यातील जानवली व फोंडा गावात, दोडामार्ग तालुक्यातील झिरोडे, आंबडगाव व माटणे गावांत तसेच बांदा येथे संबधीत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी गावभेट घेवुन नागरीकांचे समस्यांचे निरसण केलेले आहे.
सदर उपक्रमामध्ये जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील अन्य प्रशासकिय विभागाचे अधिकारी यांनी तसेच पत्रकार, स्वयंसेवी संस्था, नागरीक, विद्यार्थी, शिक्षक, गावातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आदींनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्ग पोलीस दलाचे वतीने करण्यात येत आहे.