रुग्णांना आवश्यक साहित्य सेवा केंद्राचे लोकार्पण

डॉ. सुहास पावसकर यांचा पुढाकार
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 14, 2025 12:47 PM
views 86  views

कणकवली :  डॉ. सुहास राजाराम पावसकर यांच्या माध्यमातून सीताबाई-राजाराम पावसकर रूग्ण उपयोगी साहित्य सेवा केंद्राचे लोकार्पण श्रावण सोमवारच्या निमित्ताने करण्यात आले. या केंद्रात फाऊलर कॉट, साधी कॉट, व्हीलचेअर, वॉकर, वॉटर बेड, एअर बेड, नेब्युलायझर, ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर आणि इतर बरेच साहित्य उपलब्ध करण्यात आले असून ते गरजेनुसार रूग्णाना वापरण्यासाठी नि:शुल्क-मोफत दिले जाणार आहे. रूग्ण किंवा त्याच्या नातलगांनी सीताबाई-राजाराम पावसकर रूग्ण उपयोगी साहित्य सेवा केंद्राच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधून, आपल्या आधार कार्डाची झेरॉक्स, पत्ता व संपर्क नंबराची नोंद करावी, व आवश्यक साहित्य ताब्यात घ्यावे. आपली गरज संपल्यावर साहित्य सुस्थितीत केंद्रात परत जमा करावे, जेणेकरून पुढील गरजवंताला सेवा देणे सोईचे होईल. डॉ. पावसकर हे नेहमी समाजयोपगी उपक्रम राबवत असतात.

या उपक्रमाचे उद्घाटन रोटरी क्लब-कणकवली सेंट्रलचे प्रेसिडेंट ॲड. राजेंद्र रावराणे, आय्.एम्.ए.चे डॉ. विद्याधर तायशेटे, कणकवली व्यापारी संघ अध्यक्ष दीपक बेलवलकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह नागरिक, हितचिंतक उपस्थित होते. आर्किटेक्चर श्री सिद्धेश पावसकर यांनी  कल्पकतेने इंटिरियर डिझाईन केलं आहे.  डॉक्टर पावसकर यांनी २७ वर्षांपूर्वी कणकवलीत आपले रूग्ण उपचार व सुश्रृषा केंद्र (डॉक्टर पावसकर क्लिनिक) सुरू केले आहे. रूग्णांना सेवा देतांना काळ-वेळ, साथ-संसर्ग किंवा अन्य कोणत्याही आरोग्यविषयक अडथळ्यांना न जुमानता आपले योगदान त्यांनी नेहमीच दिले. 

वैद्यकीय व्यावसायिक म्हणून जम बसवित असताना एक सहृदय व्यक्ती म्हणूनही त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली. रोटरी क्लबच्या माध्यमातून असो, आम्ही कणकवलीकरच्या माध्यमातून असो, रूग्णांच्या बरोबरीने त्यांनी वंचित, दुर्लक्षित व गरजू माणसाला कायमच मदतीचा हात पुढे केला. क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देत असताना डॉ. सुहास पावसकर यांनी एक गोष्ट कायमच निरिक्षणात घेतली होती, तपासणी झाली, निदान झाले, ट्रीटमेंट ठरली आणि प्रिस्क्रिप्शन दिले, की रूग्ण किंवा त्याच्यासोबतचा नातेवाईक भांबावून गेलेला दिसे. वैद्यकीय सेवा दिवसेदिवस महागड्या होत असताना तात्पुरत्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी अधिकच्या खर्चाची तोंडमिळवणी कशी करायची हा त्याच्यासमोरील यक्षप्रश्न असे. पण त्यांचसाठी हे अवघड जागेचे दुखणे असायचे. सहन होत नाही - सांगता येत नाही अशी स्थिती असायची.

२५ वर्षे रूग्णसेवा झाल्यानंतर यावर आपणच मार्ग काढणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आले. पण वैद्यकीय व्यवसाय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या कांही अभ्यासक्रमाची निवड करून त्याची परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्यासाठी कांही कालावधी द्यावा लागला.  व आपल्या व्यवसायाच्या जागेचे नूतनीकरण करताना अशा तात्पुरत्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी एक स्वतंत्र कक्ष अस्तित्वात आला. या उपक्रमाबद्दल डॉक्टर पावसकर यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.