
सावंतवाडी : विविध विषयांना वाहिलेले अंक आज मराठी भाषेमध्ये आहेत. त्याच पद्धतीने अलीकडे नवी मंडळी काही विशिष्ट प्रकारचे विषय हाताळत आहेत. नामदेव कोळी यांनी चहा हा विषय घेऊन लिखाण केले. आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित विषय घेऊनसुद्धा आता अंक निघतात. दिवाळी अंकांच्या किंमतीत दरवर्षी वाढत होत आहे. आज सरासरी दिवाळी अंकांची किंमत ४०० रुपये झाली आहे. पण तरीसुद्धा आपण शंभर रुपयांमध्ये १०० दिवाळी अंक वाचकांना उपलब्ध करून देत आहोत. जास्तीत जास्त वाचकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेखक प्रवीण बांदेकर यांनी केले.
श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी तर्फे आज दिवाळी अंक प्रदर्शन उद्घाटन बांदेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब बोर्डेकर, सहकार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, सचिव रमेश बोंद्रे, संचालक गोविद वाडकर, राजेश मोंडकर, राजू तावडे, ग्रंथपाल महेंद्र पटेल, रंजना कानसे, महेंद्र सावंत, प्रसाद वाडकर, कळणे ग्रंथालयाच्या सुनीता भिसे उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. बुवा म्हणाले की, या ग्रंथालयाला अनेक वर्षांची परंपरा आहे. आणि मराठी दिवाळी अंकानाही दीर्घ परंपरा आहे. अनेक उत्तम अंक मराठीत निघतात. आणि त्यातील जवळपास सर्वच या वाचनालयात उपलब्ध आहेत. वाचकांना ही उत्तम संधी आहे. यावेळी गोविंद वाडकर यांनी विचार मांडले. आभार रमेश बोंद्रे यांनी मानले.