आयुष्मान भव योजनेचा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते शुभारंभ

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 13, 2023 17:33 PM
views 174  views

सिंधुदुर्ग : केंद्र शासन व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयोजित आयुष्मान भव योजनेचा अधिकृतरीत्या शुभारंभ आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निक्षय मित्रांना प्रमाणपत्र व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्ड धारकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयुष्मान भव योजना राबविली जात आहे. या मोहिमेचे शासन स्तरावरून अधिकृतरित्या आज शुभारंभ करण्यात आला. या कालावधीत आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, अवयवदान जगृती, १८ वर्षांवरील नागरिकांची तपासणी, आयुष्मान सभा, अंगणवाडी प्राथमिक शाळा मुलांची तपासणी आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. आजच्या कार्यक्रमात अवयवदान संदर्भातील शपथ देण्यात आली.

   आजच्या कार्यक्रमात ज्या नागरिकांनी क्षय रोग मुक्त जिल्हा व्हावा यासाठी क्षय रुगांना पोषण आहार साठी आर्थिक मदत केली अशा नीक्षय मित्रांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत इ कार्ड काढलेल्या लाभार्थ्यांना ई कार्ड चे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.