विनोद तावडे यांच्या हस्ते 25 मार्चला वैभववाडीत प्रेक्षागृहाचे उद्घाटन

शैक्षणिक संकुल नामफलक अनावरण आणि महाराणा प्रतापसिंह जीवन विकास केंद्राच्या नुतन सभागृहाचे देखील होणार हस्तांतरण
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 23, 2023 19:50 PM
views 162  views

वैभववाडी : येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृहाचे उद्घाटन शनिवारी (ता.२५) भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय शैक्षणिक संकुल नामफलक अनावरण आणि महाराणा प्रतापसिंह जीवन विकास केंद्राच्या नुतन सभागृहाचे देखील हस्तांतरण होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे यांनी दिली.

येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आज (ता २३) पत्रकार परिषद झाली. यावेळी श्री रावराणे यांनी या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.

श्री.रावराणे म्हणाले, महाविद्यालयाच्या परिसरात हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृहाची उभारणी करण्यात आलेली आहे. गेली दोन तीन वर्ष हे काम सुरू होते. या प्रेक्षागृहाचे उद्घाटन माजी शिक्षणमंत्री श्री.तावडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार नितेश राणे, मेजर कौस्तुभचे वडील प्रकाशकुमार विश्वास रावराणे, ज्योती प्रकाशकुमार रावराणे, भालचंद्र सदाशिव रावराणे हे उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हा उद्घाटन सोहळा होणार आहे. याशिवाय मुंबईचे कै. सदाशिव गंगाराम रावराणे शैक्षणिक संकुलाचे नामफलक अनावरण आणि खोरकर रावराणे मंडळाले बांधलेल्या सभागृहाचे हस्तांतरण संस्थेकडे करण्यात येणार असल्याचे श्री रावराणे यांनी सांगितले.

यावेळी सचिव शैलेंद्र रावराणे, सहसचिव विजय रावराणे, कोषाध्यक्ष अर्जुन रावराणे, गणपत रावराणे, शरद रावराणे, विक्रम रावराणे, प्रभानंद रावराणे, उदय रावराणे, सुरेश रावराणे आणि संजय रावराणे हे उपस्थित होते.