
दोडामार्ग : नगरोत्थान जिल्हास्तर योजनेच्या माध्यमातून दोडामार्ग बाजारपेठेतील नूतनीकरण व सुशोभीकरण झालेल्या सार्वजनिक विहिरीचे लोकार्पण आज मंगळवारी सकाळी करण्यात आले. प्रभाग क्रमांक 11व प्रभाग क्रमांक 8 मधील महिलांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला होती.
दोडामार्ग शहरात सर्वात महत्त्वाचा मानल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक 11 मधील बाजारपेठ - आयी रोडलगत फार पूर्वीपासून एक सार्वजनिक विहीर आहे. आयी रोडवर वसलेल्या प्रभाग क्रमांक अकरा व आठ या दोन्ही प्रभागातील रहिवाशांसाठी ही विहीर फार महत्त्वाची आहे. प्रभाग क्र. अकरा मधील विद्यमान नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती श्री.नितीन मणेरीकर यांनी आपल्या या प्रभाग मधील सदर विहिरीच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान जिल्हास्तर निधी योजनेअंतर्गत नऊ लाख, 99हजार 762रु. खर्चून हे नूतनीकरण व सुशोभीकरण झाले आहे. येथील ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत परमेकर यांच्या हस्ते श्रीफळ तसेच पुजाअर्चा करून या विहिरीचे लोकार्पण करण्यात आले.
दोडामार्ग चे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, उपनगराध्यक्ष देविदास गवस, माजी सरपंच प्रदीप चांदेलकर, श्याम मणेरीकर, सागर चांदेलकर, विशांत परमेकर, भाऊ चांदेलकर, नगरपंचायतमधील सर्व नगरसेवक तसेच दोन्ही प्रभागातील नागरिक व विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांचे स्वागत नगरसेवक नितीन मणेरीकर यांनी केले.