इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानची साळशीत उद्यापासून डाळपस्वारी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 30, 2024 13:32 PM
views 163  views

देवगड : देवगड येथील शिरगाव साळशी येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व चौ-याऐंशी खेड्यांचा अधिपती असलेल्या इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाची डाळपस्वारी (चतु: सीमा फेरी ) बुधवार ३१ जानेवारी पासून सुरु होणार आहे .त्यामुळे गावात चैतन्यमय वातावरण निर्मिती झाली आहे.हि डाळपस्वारी बुधवार ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे .

डोल ताशाच्या गजरात, हर हर महादेवच्या जल्लोषात व फटाक्यांची आतषबाजीत वस्ञभुषणांनी सजवलेले देवतरंगासह हि देवता आपल्या शाही लव्याजम्यासह , बारा पाच मानकरी, ग्रामस्थ, भक्तगण ,देवाचे सेवेकरी यांच्या समवेत डाळपस्वारीस निघते. हि देवता पहिल्या दिवशी श्री देवी पावणाई देवालयातून श्री देव सिद्धेश्वर देवालयात जाते. तेथे मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी तेथील देवतेचा हुकूम घेऊन स्वारी श्री देव वशिक तळखंबा मंदिरात जाते. त्यानंतर ती श्री रवळनाथ मंदिरात जाते.तेथून श्री देव गांगेश्वर-विठ्ठलाई मंदिरात जावून मुक्कामास थांबते.तिस-या दिवशी या देवतेचा हुकूम घेऊन स्वारी श्री देव बांदिया ब्राह्मण देवालयात जाते .नंतर तेथून दुपारी श्री सत्तपुरुष मंदिरात जाते. त्यानंतर श्री बाणकी मंदिरात जाऊन मुक्कामास थांबते. चौथ्या दिवशी या देवतेचा हुकूम घेऊन स्वारी श्री देव मुळ आकार मंदिरात जातात. तेथे विश्रांती घेऊन परत येताना म्हारकी स्थळास भेट घेऊन हि श्री देवी पावणाई देवालयात शाही थाटात परत येते 

ही देवता ज्या ज्या स्थळात थांबते त्या त्या मंदिरातील देवतांचा व शिवकलेचा हुकूम घेऊनच पुढील स्वारीस निघते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी पापडीचे डाळप कार्यक्रम होतो. ही देवता स्वारी करत असताना पुर्वपांर चालत आलेल्या पायवाटेनेच मार्गस्थ होते .त्यामुळे त्या पायवाटेची स्वतः जमीनमालक साफसफाई करतात. तसेच ही देवता स्वारी विश्रांतीसाठी थांबते त्याठिकाणी उपस्थीत भक्तगणांना महाप्रसाद , चहा- लाडू, गूळ- पाणी ग्रामस्थ स्वखर्चातून देतात.देव आपल्याकडे येणार या आनंदाने व मोठ्या उत्साहात तेेथील ग्रामस्थ मंदिर व मंदिरपरिसराची साफसफाई करतात.मंदिरास रंगरंगोटी करुन मंडप घातला जातो. आकर्षक विद्युत रोषणाई करुन मंदिर सजविण्यात येते .व ध्वनिक्षेपक लावून वातावरण निर्मिती केली जाते.

हि देवता ज्या स्थळात जाते तेव्हा तेथील ग्रामस्थांची गा-हाणी शिवकळेकडून सोडविल्या जातात. या डाळपस्वारीच्या निमित्ताने सर्वजन एकत्र येतात त्यामुळे सुख दुखा:ची देवाण घेवाण होते. या डाळपस्वारीचा शेवटचा दिवस म्हणजे आनंदसोहळा हा क्षण ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी भक्तगणांची मोठी गर्दी असते. देवाची अनामिक शक्ती भक्ताला एक वेगळेच चैतन्य देते. डाळपस्वारीस चाकरमान्यांची उपस्थिती लक्षणीय असते.या वेळी माहेरवाशीणीही कृपाशीर्वाद घेण्यासाठी येतात. या डाळपस्वारीमुळे गावात उत्साह निर्माण होतो.