
दोडामार्ग : निष्क्रिय सरकारमुळे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात अपुरा औषधसाठा तसेच अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे सर्व सामान्य नागरिकांना होत असलेला त्रास आम्ही खपवून घेणार नाही, असा रोखठोक ईशारा दोडामार्ग तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.
यावेळी थेट ग्रामीण रुग्णालयाला उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख संजय गवस, मदन राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते यांनी भेट देट पाहणी केली. यावेळी अपुरा औषध साठा असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.
व अपुरे कर्मचारी वर्ग असल्याचे समजले. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गेले 4 महिने पगार दिला गेलेला नाही. त्यामुळे येथे काम करण्यास कोणी तयार नाही. स्त्री रोग तज्ञ डॉक्टर नसल्याने गर्भवती महिलांचेही मोठे हाल होत आहेत. या साऱ्या घटनेचा निषेध नोंदवत सरकारच्या उदासीन धोरणाबाबत संजय गवस व त्यांच्या टीमने नाराजी व्यक्त केलीय. यावेळी संजय गवस यांचे समवेत तालुका युवा समन्वयक मदन राणे, संदेश राणे, लक्ष्मण आयनोडकर, उप तालुका संघटक संदेश वरक, विभाग प्रमुख मिलिंद नाईक, विष्णू मुंज, मोरलेकर आदी उपस्थित होते.