वैभववाडीत जुन्या रस्त्यांच्या मो-यांचे पाईप गायब | ठेकेदार आणि अधिकाऱ्यांंनी परस्पर केला घपला?

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 09, 2023 18:28 PM
views 220  views

वैभववाडी : तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांवरील जुन्या मो-यांचे पाईप काही ठेकेदारांनी परस्पर लांबविले आहेत.यात संबंधित विभागाचा हात असून दोघांच्या संगनमताने मोठा घपला करण्यात आला आहे.तालुक्यातील या रस्त्यावरील मो-यांची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

तालुक्यात गेल्या दोन तीन वर्षांत रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी आला.यातून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली.यामध्ये सर्वाधिक कामे मुख्यमंत्री सडक योजनेतून झाली आहेत.मात्र ही काम करताना या रस्त्यावर असणा-या मो-यांवरील जुने पाईप गायब झाले आहेत.रस्ता नुतनीकरण करताना हे जूने पाईप संबंधित विभागाकडे जमा केले जातात.त्यानंतर त्यांची लिलाव प्रक्रिया राबविली जाते.अशी पद्धत आहे.मात्र तालुक्यातील बहुतांश रस्त्यावरील मो-यांचे पाईप हे परस्पर गायब झाले आहेत.काही ठेकेदारांनी हे जुने पाईप नवीन कामांवर वापरले आहेत.नविन रस्त्यांना हे जुने पाईप वापरून बीलही काढण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून हा व्यवहार केला असल्याचे बोलले जाते.या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाल्यास मोठा घपला उघडकीस येणार आहे.यात मोठमोठ्या हस्तींचा सहभाग आहे.शासनाची फसवणुक करणा-यांची चौकशी होणार का? जिल्ह्याचे अधिकारी यात लक्ष घालणार का? असा सवाल तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.