
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थ्यांनी पोलीस पाटील पदप्रक्रिया २०२३ मधील निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांनी केली आहे. याबाबत त्यांनी वेंगुर्ले तहसीलदार तसेच वेंगुर्ला पोलीस ठाणे, उपविभागीय अधिकारी कार्यालय सावंतवाडी, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग पोलीस, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री यांचे कार्यालय, भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग कार्यालय सावंतवाडी पोलीस ठाणे यांना निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला आहे.
निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, वेंगुर्ला तालुक्यातील सर्व रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी महसुली गावनिहाय शासनाकडून भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी लेखी परीक्षा ७ जानेवारी २०२४ रोजी व तोंडी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आली. लेखी परीक्षेचे गुणही प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी अंतिम यादी जाहीर होणे अपेक्षित होते, मात्र अंतिम यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. तसे न झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा फटका या उमेदवारांना सोसावा लागत आहे. प्रशासन जाणून बुजून चाल-ढकल करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
प्राप्त माहितीनुसार दोन तालुक्यांची यादी नियमाप्रमाणे जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र वेंगुर्ले तालुक्याची यादी जाहीर करण्यात दिरंगाई होत आहे. तरी शासनाने तातडीने अंतिम यादी जाहीर करून, नियुक्ती करून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे द्यावीत. पुढील ८ दिवसात म्हणजेच १ ऑगस्ट २०२४ पर्यंत अंतिम यादी जाहीर करून नियुक्ती न दिल्यास आम्ही सर्व परीक्षार्थी सनदशीर मार्गाने आपला रोष व्यक्त करण्याकरिता उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय सावंतवाडी यांचे कार्यालया समोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेत आहोत तरी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. असे निवेदनात म्हटले आहे.
वेंगुर्ले तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी व्यंकटेश कोचरेकर, जोगेश सारंग, सुशांत नाईक, मुक्ता परूळेकर, सोनाली नळेकर, शर्मिला जळवी, समीर गोसावी, अनुप नार्वेकर, मनस्वी सावंत, लीना राऊळ, तेजस्वी पार्सेकर, प्रतीक्षा मुंडये, दीप्ती मुणनकर, समिधा धुरी, शुभम जाधव, दादू म्हापणकर, पांडुरंग पडवळ, प्राची पेडणेकर, मयुरेश राऊत, श्याम नेमण, श्रावणी भगत, शिवप्रसाद परब, अमित माडये, सिताराम राणे, स्वप्नाली मसुरकर आदी उपस्थित होते.