
सावंतवाडी: शेर्ले येथील शिवसेना शाखाप्रमुख अनिल पिंगुळकर यांनी आमची दिशाभूल करत शिवसेना प्रवेश दाखवला. मात्र, आम्ही भारतीय जनता पार्टीतच कायम आहोत असे मत अनिल राऊळ व ग्रामस्थांनी व्यक्त केले. भाजप कार्यालयात त्यांनी आपली भूमिका मांडली.
रस्त्याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडे घेऊन जात शाखाप्रमुखांनी दिशाभूल करून प्रवेश दाखवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग म्हणाले, विधानसभा महायुती म्हणून आम्ही लढलो आहोत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असं आमचं ठरलेलं आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने प्रवेश दाखवले जात आहेत. या गावच्या पुलासाठी माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी निधी दिला. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी अतिरिक्त निधी दिल्यानंतर हे काम पूर्णत्वास आले आहे. येथील जनता ही भाजपच्या पाठीशी आहे. शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांनी फसवणूक न करता महायुतीचा धर्म पाळावा. आमदार दीपक केसरकर यांच्याशी आपण चर्चा करणार असून यावर तोडगा न काढल्यास गावागावात जाऊन भाजप पक्षप्रवेश करेल असा इशारा श्री. सारंग यांनी दिला.याप्रसंगी जिल्हा चिटणीस महेश धुरी, मधुकर देसाई, उदय धुरी, योगेश केणी, विराज नेवगी, अजित शेर्लेकर, अजित शेर्लेकर, राजेश चव्हाण, अनिल राऊळ, वसंत धुरी, देवीदास राऊळ, प्रकाश राऊळ, लक्ष्मण जाधव, अरूण राऊळ, सुहासिनी राऊळ, दर्शना राऊळ, दिपीका राऊळ, प्रभाकर राऊळ आदी उपस्थित होते.