सिंधुदुर्ग जिल्ह्यात तलाठी भरती स्पर्धेसाठी परीक्षेसाठी केंद्र देण्यात यावे : अर्चना घारे- परब

Edited by: विनायक गावस
Published on: August 13, 2023 13:46 PM
views 216  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तलाठी भरती स्पर्धेसाठी परीक्षेसाठी केंद्र देण्यात यावे, यासाठी अनेक विद्यार्थी फोनवरून संपर्क साधत हे केंद्र सुरू करण्याची मागणी करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र्य केंद्र द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे- परब यांनी केली आहे.

राज्यात तलाठी पदासाठी सुमारे ४६६६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.या स्पर्धेसाठी राज्यातून ११ लाख १० हजार परीक्षार्थी बसले असून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखील हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी फॉर्म भरले आहे.परंतु आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षा केंद्र नसल्याने मुलांना ही परीक्षा देण्यासाठी कोल्हापूर केंद्रात जावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आम्ही केलेल्या मागण्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील व आ.रोहित पवार यांनी या परीक्षांच्या शुल्काबाबत आवाज उठवला होता जर प्रत्येक विद्यार्थ्याकडून तुम्ही एक हजार रुपयांचे शुल्क घेत असाल तर त्याच्या जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र उपलब्ध आपण करू शकत नाही ही शोकांतिका आहे.आज देखील याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांच्याशी फोनवर संपर्क साधून राज्य सरकारला याबाबत विचारणा करण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी आम्ही याबाबत पाठपुरावा करत आहोत असे सांगितले.

याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष असून या परीक्षेसाठी जिल्ह्यात सेंटर उपलब्ध करण्याची आमची मागणी असून जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने शासनास कळवावे व जिल्ह्यात किमान एक सेंटर तरी या विद्यार्थ्यांसाठी सुरू करावे अशी मागणी अर्चना घारेंनी केली आहे.