देवगड हापूस मार्केटात ; सध्याचे दर पाहिलेत का ?

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 19, 2024 14:15 PM
views 4731  views

देवगड : पर्यावरणीय बदलामुळे आलेल्या संकटावर मात करत हापूस आंबा बाजारपेठेत येऊ लागला आहे. हापूस आंब्याचा दर ७०० ते १२०० रुपये डझन आहे. त्यामुळे तुमच्या खिशाला कात्री लावणारा ठरणारा आहे.

यंदा बदलते हवामान, अवकाळी पाऊस आणि खार पडल्याने मोहर जळला तसेच थंडीचे आगमन देखील लांबले आणि थंडीच्या आगमनामध्ये देखील फरक पडल्याने झाडावर मोहर टिकला नाही. त्यामुळे यंदा आंबा लांबला आहे. तसेच लवकर मोहर आलेल्या आंबा सध्या परिपक्व झाला असून तो देवगड बाजारपेठेत येत आहे. स्थानिक बाजारपेठेत आंबा ७०० ते १२०० रुपयापर्यंत प्रति डझन असल्याने स्थानिकांना तो आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याचे बोलले जात आहे. आंब्याची आवक सध्या वाढली आहे .आंब्याचा दर कमी झाल्यानंतर ग्राहक त्याला मोठ्या प्रमाणात पसंती देतील असे बोलले जात आहे.

देवगड जामसंडेच्या बाजारपेठेत देवगड हापुस आंबा मोठ्या प्रमाणात येतो आणि त्यावेळी ग्राहक हा आंबा घाऊक पद्धतीने विकत घेत असताना पहायला मिळतात. यंदा आंबा पीक सध्या तरी कमीच प्रमाणात आहे असे सांगितले जाते आहे. तरीही  फळांचा राजा बाजारात दाखल होत आहे. 

देवगड हापूस आंब्याच्या पेटीला ६ हजार रुपयांचा दर मिळत आहे. फळांचा राजा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो देवगड हापूस आंबा. हाच हापूस आंबा आता बाजारात दाखल झालाय. पिकलेला आंबा बाजारात येताच त्याच्या घमघमाटाने तोंडाला पाणी सुटते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूस लवकरच बाजारात दाखल झाला आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणचा राजा देवगड हापूस आंब्याला बाजारात मागणी वाढत असते.

यंदा बाजारात लवकर आंबे दाखल झाले असले तरी भाव मात्र कमी नाहीत.आंब्याचा भाव जरी चढ़ा असला तरी मागणी देखील मोठ्या प्रमाणावर आहे. बाजारात हापूस मुबलक प्रमाणात जरी उपलब्ध होत असला तरीही ग्रामीण भागातील खवय्यांकडून आंब्याला जास्त मागणी असल्याचे पाहायला मिळते. देवगड, कट्टा, कुणकेश्वर सह कोकणातून आंब्यांची रोज आवक होत असून खवय्ये सध्या आपल्या अवडीसाठी कितीही पैसे मोजायला तयार असल्याचे पाहायला मिळते.

७०० ते १२०० डझन मार्केट मध्ये रेट

 सध्या आंबा थोडा महाग जरी असला तरी आंब्याचे चाहते कितीही पैसे मोजून घेऊन जाण्यास तयार आहेत. सध्यातरी एक डझन आंब्याचा भाव १००० ते १२०० रुपये असून ४ ते ७ डझन आंब्यांची पेटीला ४ ते ५ हजार रुपये मोजावे लागत आहे. पाडव्यानंतर भाव कमी होतील अशी अपेक्षा आहे.

लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारे फळ हापूस आंबा असल्याने अनेकजण उन्हाळ्यात आंबे खाण्यास पसंती देतात, मात्र भाव कमी झाल्यानंतर सामान्य नागरिक खाण्यास पसंती देत असले तरी बाजारात आल्या आल्या पहिला आंबा आम्ही खाणारच अशीही मंडळी पाहायला मिळत आहे. एकंदरीत मार्चमध्ये जरी आंब्यांचे भाव जास्तीचे असले तरी गुढी पाडव्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता असल्याचे यावेळी देवगडचे उत्पादक शेतकरी प्रणव पाटील व ओमकार गावकर यांनी सांगितले.