
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या आणि सर्वच राजकीय पक्ष आपले मनुष्यबळ वाढवणे आणि आपली सत्ता स्थापन करणे यात मग्न झाले होते. त्यानंतर निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि १८ डिसेंबर रोजी मतदान कार्यक्रम समाप्त झाला.
त्यानंतर आता निकालानंतर गावागावात कोण उधळणार गुलाल? कोण कोणाला देणार जोरदार धक्के? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले. प्रत्येक जण आपल्या अंदाजाप्रमाणे आपापल्या पक्षाचा अंदाजे निकाल चर्चेत मांडत आहे. मात्र जो खरा-खुरा गुलाल आहे तो नेमका कोण उधळणार? हे काही वेळात जाहीर होणार आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता सर्वांच्या नजरा आजच्या निवडणूक निकालाकडे लागून राहिल्या आहेत.
राज्याची स्थिती
राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार रविवारी सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.
जिल्ह्यातील परिस्थिती...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२५ ग्रामपंचायतींपैकी ३२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २९३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांच्या निवडींसाठी रविवारी मतदान झाले. ९२९ मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ७१९ सरपंच उमेदवारातून २९३ सरपंच आणि ४ हजार ६४९ उमेदवारातून २५५१ सदस्यांचे भवितव्य मतदान यंत्रात सिलबद्ध झाले. मंगळवारी म्हणजे २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन जिल्हातील निवडणुका झालेल्या २९३ गावांचे सरपंच व या गावातील ग्रामपंचायत २५५१ सदस्य विजयी होणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकीतील उमेदवार व राजकीय पक्षाच्या नेत्यांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.