सुधारीत नळयोजना आपल्या कारकिर्दीत गतीशील : संजू परब

Edited by: विनायक गावस
Published on: February 09, 2024 09:09 AM
views 92  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेची सुधारीत नळयोजना माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीतच गती घेऊ शकली. विद्यमान पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सत्ता नसतानाही त्यासाठी मदत केली होती. नगराध्यक्षपदाच्या काळात सुधारीत नळयोजनेला तांत्रिक मंजूरी मिळवून वैशिष्टपूर्ण योजनेतून लोक वर्गणी भरण्याबाबत ठरावही घेण्यात आला होता. त्यासाठी नेमलेल्या एजन्सीला पैसे देण्याचे कामही आम्हीच केले. त्यानंतर या सुधारित नळपाणी योजनेसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ५७ कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे त्यांच्यामुळेच ही नळयोजना मार्गी लागली असल्याचा दावा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला.सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

दरम्यान, सावंतवाडी शहरवासीयांच्या दृष्टीने उद्याचा दिवस हा आनंदाचा क्षण असून शहरवासीयांनी दिवाळी साजरी करावी. ते म्हणाले, माझ्या दोन वर्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात सावंतवाडी शहरातील रखडलेली अनेक विकासकामे मी मार्गी लावली.  संत गाडगेबाबा मंडईच्या जागी होत असलेले भव्य कॉम्प्लेक्स व अग्निशमन इमारत ही दोन्ही कामे देखील माझ्याच सहीने मंजूर झाली होती. तसेच नवीन अग्निशमन बंब देखील माझ्याच ठरावाने मंजूर झाला होता. यासंदर्भात कोणाला माहिती हवी असल्यास ते माहितीच्या अधिकाऱ्यात ती घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीने सावंतवाडी नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी संकुलातील गाळेधारकांचे भाडे वाढवले होते. तसेच नव्याने प्रीमियम भरण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, या संदर्भात चार वर्षे होऊनही निर्णय झाला नसल्याने शासनाचे कोट्यावधी रुपये नुकसान झाले असून त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. तर या संदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन भाडेवाढ व प्रीमियम वसुलीबाबत मागणी करण्यात येणार आहे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. तर याबाबत प्रशासनाकडून निर्णय झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.तसेच अग्निशमन केंद्राच्या सुरू असलेल्या इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या इमारतीच्या फाउंडेशन साठी वापरण्यात येणारे स्टील योग्य प्रतीचे नसून सिमेंट देखील योग्य ग्रेडचे वापरले गेले नाही. त्यामुळे इमारत अधिक का टिकू शकणार नसण्याची भिती आहे. त्यामुळे कॉलिटी कंट्रोलच्या अहवाला शिवाय संबंधित ठेकेदाराचे बिल काढू नये अशी मागणी संजू परब यांनी केली आहे.

पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून जगन्नाथराव भोसले उद्यानात बसविण्यात आलेल्या खेळण्यांवर मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. तसेच मोती तलावात जे सांडपाणी येत आहे त्याला आरोग्य यंत्रणाच कारणीभूत असून मुख्याधिकाऱ्यांनी त्याकडेही लक्ष द्यावे. शहरवासीयांचा पैसा तसेच आरोग्य याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आपण गप्प राहणार नसून याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.यावेळी त्यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी दीनानाथ नाईक उपस्थित होते.